भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाण्याला अचानक चढला हिरवा रंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:53 IST2025-07-22T13:52:37+5:302025-07-22T13:53:11+5:30
- परिसरात पसरली दुर्गंधी; काही गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; संगमनेर व शेजारील गावांमध्ये रुग्णांच्या प्रमाणात वाढ

भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाण्याला अचानक चढला हिरवा रंग
भोर : तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणाच्या परिसरातील पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरीवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी व नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
भाटघर धरणाच्या उत्तरेकडील धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावर हिरवेगार पाणी दिसत आहे तसेच या हिरव्यागार पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे भाटघर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाटघर धरणात हिरवेगार पाणी दिसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार दिवसांपासून धरणात हिरवेगार पाणी असल्याने संगमनेर व शेजारील गावात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नऱ्हे व माळवाडी येथे खासगी दवाखाना असून, सद्यस्थितीला दोन्ही दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. गावातील वयस्कर व चिमुकल्यांच्या जीवाला जास्त धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणी गढूळ होऊन दूषित झाले आहे. परंतु चार दिवसांपासून पाण्याचा रंग बदलला असून, पाणी हिरवेगार दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धरणातील पाण्याने अचानक रंग बदलल्याने पाण्यामध्ये कुणी रसायन टाकले आहे की काय? किंवा धरण पाणलोट क्षेत्राच्या शेजारील फार्म हाउसवाल्यांनी ड्रेनेज लाइनचे पाणी सोडले आहे की काय? तसेच मच्छ पालन व्यवसायाचा पाण्यावर विपरीत परिणाम होऊन कदाचित पाण्याचा रंग बदलला असेल, असे तर्कवितर्क नागरिकांमधून होत आहे.
मत्स्य विभागाने धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जलाशयात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि परिणामी पाण्याला हिरवा रंग दिसून येतो. तो काही कालावधीत पूर्ववत होतो. - गणेश टेंगळे, भाटघर प्रकल्प शाखा अभियंता
जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर त्वरित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागास दिल्या आहेत. - डॉ. विकास खरात, उपविभागीय अधिकारी, भोर