जिल्हा परिषद निवडणुक : बारामतीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ उमेदवारांची धावपळ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:03 IST2025-10-29T14:02:35+5:302025-10-29T14:03:57+5:30
इच्छुक उमेदवारांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या राजकीय महत्त्वाकांक्षेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यावर उमेदवारांचा विशेष भर आहे.

जिल्हा परिषद निवडणुक : बारामतीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ उमेदवारांची धावपळ सुरू
बारामती : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी बारामतीत सुरू झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व गट-गणनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या राजकीय महत्त्वाकांक्षेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यावर उमेदवारांचा विशेष भर आहे.
दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून अनेक इच्छुकांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गण आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सहकारी साखर कारखाने, दूध संस्था, बाजार समिती आणि सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. त्यामुळे उमेदवारी देताना अजित पवार यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
महायुतीचा भाग असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे तालुक्यात फारसे अस्तित्व नसले तरी निवडणुकीच्या गणितांवर त्यांचा प्रभाव पडणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीतील वाटाघाटी फिसकटल्यास घटक पक्ष एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर कारखान्यावरील शेतकरी मेळाव्यात तरुणांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत. बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सर्वसाधारण गट राखीव असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. २०१७ नंतर आठ वर्षांनी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. गावोगावी राजकीय गटबाजींना वेग आला असून, अनेकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
गट-गण आरक्षण :
जिल्हा परिषद : सुपा (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), गुणवडी (अनुसूचित जाती महिला), पणदरे (सर्वसाधारण), वडगाव निंबाळकर (सर्वसाधारण महिला), निंबूत (सर्वसाधारण), निरावागज (अनुसूचित जाती).
पंचायत समिती : निरा वागज (अनुसूचित जाती), डोर्लेवाडी (इतर मागासवर्गीय महिला), सुपा (सर्वसाधारण महिला), काऱ्हाटी (सर्वसाधारण महिला), शिर्सुफळ (सर्वसाधारण), पणदरे (सर्वसाधारण), मुढाळे (सर्वसाधारण महिला), मोरगाव (नागरिकांचा मागासवर्ग), वडगाव निंबाळकर (सर्वसाधारण), निंबूत (सर्वसाधारण), कांबळेश्वर (नागरिकांचा मागासवर्ग महिला).
२०१७ची पार्श्वभूमी
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सहा गट आणि १२ गणांमध्ये विजय मिळवला होता. शिर्सुफळ-गुणवडी गटातून रोहित पवार यांनी राजकीय प्रवेश केला; परंतु २०१९ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढवली. सुपे-मेडद गटात भाजपने चुरशीची लढत दिली होती; परंतु राष्ट्रवादीने विजय खेचला.
राजकीय गणित
माळेगावचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने पणदरे गट नव्याने तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे विरोधक चंद्रराव तावरे यांची भूमिका निवडणुकीवर परिणाम करणार आहे. भाजप नेत्यांचा शिर्सुफळ गणात प्रभाव असून, बाजार समितीच्या सभापतिपदामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांवर दुरंगी किंवा तिरंगी लढतीचे चित्र अवलंबून आहे.