Pune : पालिकेने निवडणुकीसाठी मागितले १७ मुख्य निवडणूक अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:55 IST2025-09-01T12:54:17+5:302025-09-01T12:55:07+5:30
सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात येणार

Pune : पालिकेने निवडणुकीसाठी मागितले १७ मुख्य निवडणूक अधिकारी
पुणे :पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या ४ सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहेत. त्यातच पालिकेच्या निवडणूक कार्यालय निहाय निवडणुकीसाठी १७ मुख्य निवडणूक अधिकारी आणि ३४ सहायक निवडणूक अधिकारी देण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रभागनिहाय निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे.
नगरसेवकांची संख्या १६५ असून ४१ प्रभाग आहेत. त्यामुळे पालिकेने दोन ते तीन प्रभागांसाठी एक अशा प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. त्यात १५ अधिकारी तसेच २ अतिरिक्त अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. या अधिकाऱ्यांकडे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अर्ज मागविणे, अर्जाची छाननी आणि निकालाचे कामकाज अशी जबाबदारी असेल.
सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात येणार
पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दिलेल्या नागरिकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची माहिती घेतली आहे. या हरकती सूचना वरील सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्यानंतर हरकत घेणाऱ्यांना सुनावणीचे वेळापत्रक पाठविले जाणार आहे. ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचनांची सुनावणी होणार आहे. ज्या नागरिकांच्या हरकतींची सुनावणी शिल्लक राहील त्यांच्यासाठी एक दिवस स्वतंत्र सुनावणीसाठी ठेवण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.