हिरकणी कक्षातच थाटले पुरुष पर्यवेक्षक कार्यालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:28 IST2025-12-11T10:28:49+5:302025-12-11T10:28:57+5:30
- शिवाजीनगर येथील वाकडेवाडी एसटी बसस्थानकात प्रवासी स्तनदा मातांची होतेय कुचंबणा

हिरकणी कक्षातच थाटले पुरुष पर्यवेक्षक कार्यालय
- संजय चिंचोले
पुणे : आपल्या चिमुकल्याला स्तनपान करता यावे या उदात्त हेतूने एसटी महामंडळाने प्रमुख बसस्थानकांवर हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय १० मे २०१३ रोजी घेतला होता. मात्र, शिवाजीनगर वाकडेवाडी बसस्थानकातील हिरकणी कक्षातच ड्यूटीवरील पर्यवेक्षक कार्यालय थाटण्यात आले आहे. त्यामुळे मातांना बाळांना स्तनपान करताना व्यत्यय येत आहे. विशेष म्हणजे येथील बसस्थानकात हिरकणी कक्षासाठी एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या छोट्याशा सेल्टरमध्ये नियमानुसार कुठल्याही सुविधा नसल्याचे समोर आले आहे. एकूणच स्तनदा मातांच्या संवेदनशील प्रश्नांकडे एसटी महामंडळाकडून डोळेझाक होत आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचे काम एसटी स्थानकाच्या जागेतून केले गेले. परिणामी शिवाजीनगरातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसस्थानक ३० डिसेंबर २०१९ पासून वाकडेवाडी येथील आरे मैदान अर्थात सरकारी दूध योजनेच्या तब्बल साडेपाच एकर जागेत स्थलांतर केले गेले. या ठिकाणी पुणे महामेट्रो प्रशासनामार्फत प्रवाशांसाठी २० फलाट तयार केले. त्यावर शेडही उभारले, तसेच प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडे आणि स्वच्छतागृह, तसेच एसटी वर्कशॉपसाठी शेड, आगार व्यवस्थापकांसाठी केबिन, पार्सेल व्यवस्थेसाठी शेड आदींची व्यवस्थाही करून दिली आहे.
मात्र, पुणे महामेट्रो आणि एसटी प्रशासनाला तान्हुल्यांसमवेत प्रवास करणाऱ्या स्तनदा माता प्रवाशांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा मात्र विसर पडला. वाकडेवाडी बस स्थानकातून सद्य:स्थितीत २४ तासांत दोन हजार गाड्यांची ये-जा होते. या बसस्थानकातून एसटी महामंडळाला महिन्याला तब्बल बारा कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. मात्र बसस्थानक सुरू झाल्यापासून येथे तान्हुल्यांसमवेत प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांसाठी तब्बल तीन वर्ष हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली नव्हती.
ही पुण्यातील 'इनर व्हिल क्लब'च्या वतीने सन २०२२-२३ मध्ये १० बाय तीसचे शेल्टर एसटी महामंडळाला मोफत दिले. संबंधित संस्थेनेच येथील बसस्थानकातील स्तनदा मातांना ठळकपणे लक्षात येण्याकरिता शेल्टरच्या दर्शनी भागात छोटेखानी फलक लावले. मात्र, एसटी महामंडळाने बालकांचे छायाचित्र असलेले पोस्टर लावण्याची व जाहिरात करण्याची तसदीही घेतली नाही. याउलट हिरकणी कक्षाच्या शेल्टरवर स्वतःच्या व इतर खासगी इस्पितळाच्या जाहिराती लावून दुकानदारी सुरू केली आहे. ज्या उद्देशाने संबंधित संस्थेने हिरकणी कक्षासाठी शेल्टर उपलब्ध करून दिले त्याच्या निम्म्या भागांत पडद्याचे पार्टिशन करून बाब लक्षात आल्यानंतर चक्क ड्यूटीवरील पर्यवेक्षक कार्यालय थाटले आणि हिरकणी कक्षाच्या उद्देशालाच हरताळ फासला.
हिरकणी कक्षातील या पर्यवेक्षक कार्यालयात पुरुष अधिकारी बसत असल्याने व एकाच प्रवेशद्वारातून पुरुष कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असल्याने हिरकणी कक्षाचा वापर स्तनदा माता करत नाहीत. यामुळे हा हिरकणी कक्ष 'असून अडचण नसून खोळंबा' असा आहे. दरम्यान, येथील हिरकणी कक्षाच्या वास्तविकतेकडे एसटी महामंडळ प्रशासनाला थेट सवाल करताच आम्ही हिरकणी कक्षातील पर्यवेक्षक कार्यालय येत्या १५ दिवसांत हलवणार आहोत, यासाठी नवीन शेल्टरची ऑर्डर दिली असल्याचे कनिष्ठ आगार प्रमुख अभिजित थोरात यांनी सांगितले.
हिरकणी कक्षात असाव्यात सोयी-सुविधा
१ हिरकणी कक्ष बंदिस्त असावा. मात्र, येथे स्वच्छता, हवेशीर आणि पुरेसा प्रकाश असावा.
2प्रत्यक्षात कक्ष फलाटाच्या मधोमध असल्याने गर्दी गोंगाट सुरू असतो. आईला दूध काढताना सोयीस्कर बसता यावे यासाठी आरामदायी खुर्ची टेबल असणे बंधनकारक आहे.
दूध ठेवण्यासाठी फ्रीज किंवा
3 कूलरची सोय असावी. हात धुण्यासाठी बेसीन आणि स्वच्छतेची साधने असावीत. पिण्याचे स्वच्छ पाणी तेथेच असावे.
महिला व बालकल्याण विभागाच्या नियमानुसार किमान ६० x ६० फूट आकाराची स्वतंत्र खोली असावी. प्रत्यक्षात येथील १००२० च्या खोलीचे दोन भाग करण्याचा पराक्रम एसटीने केला आहे.
आम्ही काय करायचे ?
हिरकणी कक्षात थाटलेल्या पर्यवेक्षक कार्यालयात पुरुष अधिकारी बसलेले असतात. शिवाय येथे ये-जा करण्यासाठी एकाच प्रवेशद्वार आहे. पुरुष कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असल्याने हिरकणी कक्षाचा वापर महिलांनी कसा करायचा? येथील हिरकणी कक्ष नावालाच असल्याने महिलांनी तान्हुल्यांच्या स्तनपानासाठी कुठे जावे, असा संतप्त सवाल स्तनदा मातांनी उपस्थित केला आहे.
असा असावा कक्ष...
महिला व बालकल्याण विभागाच्या धोरणानुसार व नगरविकास विभागाच्या आदेशानुसार हिरकणी कक्षात स्तनदा मातांसाठी स्तनपान आणि बाळासाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. सुरक्षित, स्वच्छ, हवेशीर आणि खासगी जागा आवश्यक आहे, जिथे महिलांना तान्हुल्यांना स्तनपान करता यावे, बाळाला थोडा वेळ ठेवता यावे, तसेच हिरकणी कक्षात आवश्यक फर्निचर, पाळणा आणि स्वच्छतागृहाची सोय असावी. मात्र, वाकडेवाडी येथे हिरकणी कक्षात केवळ एकच बाकडा आणि पाळणा आहे.