शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:42 IST2025-10-26T16:41:47+5:302025-10-26T16:42:44+5:30

- दिवसाढवळ्या बिबट्याची झडप, नागरिक भयभीत : वन विभागाच्या प्रयत्नांना खो, गावागावांत बिबट्याचा मुक्त संचार बेफाम

pune news the leopard terror in Shirur taluka did not stop; it attacked two-wheeler riders within 72 hours | शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

- सचिन चव्हाण

मलठण :
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मागील दहा दिवसांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाच्या प्रयत्नांना यश येत असले तरी बिबट्यांचा मुक्त संचार कायम आहे. शुक्रवारी बारा तासांत तीन बिबट्यांना पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले असले तरी ७२ तास उलटले नाहीत तोच शनिवारी दुपारी दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाकडे अधिक पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात मागील दहा दिवसांपूर्वी दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. पिंपरखेड येथे शिवन्या बोंबे या चिमुरडीचा आणि जांबुत येथे ७० वर्षांच्या भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनांनी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर वन विभागाने बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. २४ रोजी बारा तासांत तीन बिबट्यांना यशस्वीपणे जेरबंद करण्यात आले. हे बिबटे माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शेतकरी कचर महादू बोंबे यांच्या उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात साधारण ६ ते ७ वर्षे वयाचा पूर्ण वाढलेला नर बिबट्या अडकला. त्याच वेळी पारगाव रोड परिसरात शेतकरी नरेश सोनवणे यांच्या घराजवळील पिंजऱ्यात ४ वर्षे वयाचा बिबट्या आणि दाभाडे मळा परिसरात गजानन गिरी गोसावी यांच्या शेतात ५ वर्षे वयाचा पूर्ण वाढलेला मादी बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्यांची तपासणी करून त्यांना सुरक्षितपणे केंद्रात नेले. मात्र, या परिसरात बिबट्यांची संख्या २०० ते २५० इतकी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पिंजऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याची टीका होत आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मते, बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत वन विभागाचे प्रयत्न अपुरे आहेत.

दरम्यान, शनिवार, दि. २५ रोजी दुपारी १ वाजता आणखी एक धक्कादायक घटना घडली. विशाल जुन्नर पाटपेडीचे शाखा व्यवस्थापक गणेश गोसावी आणि लेखनिक कैलास बोरचटे हे दुचाकीवरून कामानिमित्त जात असताना जांबुत येथील एचपी पंपाजवळील ओढ्यात डबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोसावी यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला आणि जोरदार आरडाओरडा केला. यामुळे बिबट्या शेजारच्या उसाच्या शेतात पळून गेला. ‘‘जर आम्ही वेळीच लक्ष दिले नसते तर ही घटना मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरली असती,’’ असे घाबरलेल्या असलेल्या गोसावी आणि बोरचटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

अधिकाधिक पिंजरे लावण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी 

बेट भागात अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. उसाच्या शेतांमध्ये आणि गावांच्या जवळपास ते फिरत असल्याने शेतकरी, मजूर आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. मागील दहा दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तिघा जनावरांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘‘आणखी किती घटना घडल्याशिवाय वन विभाग गांभीर्याने कार्यवाही करणार?’’ असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी वन विभागाकडे अधिकाधिक पिंजरे लावण्याची आणि परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

गांभीर्य नसल्यास हा ‘खेळ’ आणखी जीवघेणा ठरू शकतो 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी मोहीम सुरू असून, आणखी पिंजरे लावण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांच्या मते, उपाययोजनांबाबत गांभीर्य नसल्यास हा ‘खेळ’ आणखी जीवघेणा ठरू शकतो. शिरूर तालुक्यातील या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. वन विभागाने स्थानिकांशी समन्वय साधून बिबट्यांच्या वास्तव्याचे निरीक्षण वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मागील दहा दिवसांत घडलेल्या घटना :
बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू (शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव). तिघा जनावरांवर जीवघेणे हल्ले. 

वन विभागाला आवाहन :
उपाययोजनांबाबत गांभीर्य न दाखवल्यास नागरिकांसाठी आणखी धोके वाढू शकतात. अधिक पिंजरे आणि गस्त आवश्यक

Web Title : शिरूर में तेंदुए का आतंक जारी; 72 घंटों में ही मोटरसाइकिल सवारों पर हमला

Web Summary : शिरूर में तेंदुए का हमला जारी है, हाल ही में मोटरसाइकिल सवारों पर हमला हुआ। तीन तेंदुओं को पकड़ने के बावजूद, ग्रामीणों में डर है। पिछले दस दिनों में दो मौतें हुईं। स्थानीय लोग अधिक पिंजरों और गश्त की मांग करते हैं।

Web Title : Leopard terror continues in Shirur; attacks motorcyclists within 72 hours.

Web Summary : Leopard attacks persist in Shirur, with one recent attempt on motorcyclists. Despite trapping three leopards, fear grips villagers. Two deaths occurred in the last ten days. Locals demand increased cages and patrols.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.