Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:01 IST2025-12-12T11:01:05+5:302025-12-12T11:01:26+5:30
झुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. गाडी पडल्यामुळे गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली.

Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला
गराडे : पुरंदर आणि हवेली तालुक्याच्या सीमेवर असलेल्या महत्त्वपूर्ण बोपदेव घाटाच्या दुसऱ्या वळणावर बिबट्याने भिवरी (ता. पुरंदर) येथील गणेश लक्ष्मण कटके व दत्तात्रय लक्ष्मण कटके यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गणेश कटके याच्या खांद्याला दुखापत झाली आहे.
याबाबत उद्योजक अक्षय बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले की, गणेश कटके व दत्तात्रय कटके हे दोघे सख्खे बंधू पुणे शहरातील आपले काम उरकून बुधवारी (दि १०) रात्री साडेदहाच्या सुमारास बोपदेव घाटातून आपल्या भिवरी गावाकडील घरी परतत होते. यावेळी झुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. गाडी पडल्यामुळे गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली. त्यांच्या मागून पारगाव येथील रहिवासी भाजप नेते गणेश मेमाणे यांची चारचाकी गाडी येत असल्यामुळे बिबट्या पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. गणेश कटके यांच्या खांद्यावर पुणे येथील भगली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
भाजपा नेते गणेश मेमाणे व जालिंदर वाडकर यांनी सांगितले की, सुमारास दिवे व बोपदेव घाट परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्या हा हिंस्र प्राणी असल्यामुळे परिसरातील सर्व गावांतील नागरिकांनी काळजी घ्यावी. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून तातडीने पकडावे. भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती कटके यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा यासाठी वनविभागाकडे लेखी पत्र दिले आहे.
बोपदेव व दिवे घाट परिसर पुरंदर व हवेली तालुक्याच्या जंगल सीमेवरील आहे. यामुळे या परिसरात पूर्वीपासून बिबट्याचा वावर असतो. वन खात्यामार्फत त्या भागातील नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केलेले आहे. बिबट्याचा पुढील वावर पाहून पिंजरा बसवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे पुरंदर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले.