डांबर खरेदीत घोटाळा : ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:54 IST2025-04-17T14:50:43+5:302025-04-17T14:54:39+5:30

महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य

pune news The head of the department where the scam allegations are made will be investigated; Many are surprised by the decision of the Municipal Commissioner | डांबर खरेदीत घोटाळा : ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी

डांबर खरेदीत घोटाळा : ज्या‌ खात्यावर घोटाळ्याचे आरोप; त्याच खात्याचा प्रमुख करणार चौकशी

-हिरा सरवदे

पुणे :
महापालिकेला डांबर पुरविणाऱ्या ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची लूट केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या पथविभागावर आरोप झाले, त्याच पथविभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घोटाळ्याच्या आरोपानंतर महापालिका आयुक्तांनी डांबर खरेदीच्या निविदा थांबवून पुढील तीन महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने पथ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. नीलेश निकम यांनी केला होता. 

या ठेकेदाराने महापालिकेला डांबर पुरवठा केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठविले. एकाच मालाची दोन्हीकडे विक्री करून दोन्ही ठिकाणांहून बिले घेतल्याचा आरोप करत टैंकर क्रमांक, दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावे दिले होते. तसेच या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचे अॅड. निकम यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

पूर्वी महापालिका थेट रिफायनरी कंपनीकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, मागील तीन वर्षापासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केले जात आहे. यामुळे महापालिकेला दहा ते बारा कोटी रुपये अधिक द्यावे लागत आहेत, असाही आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने पुन्हा तीन वर्षांसाठी डांबर पुरवठ्याची निविदा मागविली होती. पुन्हा पूर्वीच्या एकाच कंपनीची निविदा आली आहे. संबंधित ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही फसवणूक करणाऱ्या कंपनीलाच काम देण्याचा घाट पथ विभागाकडून घातला जात असल्याचा आरोप करत अॅड. निकम यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मागील खरेदीची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थेट कंपन्यांकडून खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली.

यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांना चौकशीचे आदेश दिले.

ज्या विभागावर आरोप त्याच्या प्रमुखांकडून चौकशी

निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली असून पुढील तीन महिने थेट कंपनीकडूनच डांबर खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ज्या विभागावर आरोप झाला आहे, त्याच विभागाच्या प्रमुखावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे डांबर घोटाळ्याची चौकशी निष्पक्ष होईल का याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

लवकरच प्रकरणाचा दिला जाईल अहवाल

डांबर खरेदी प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल, त्यानंतर आयुक्तांकडून पुढील कार्यवाही केली जाईल तूर्तास अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

Web Title: pune news The head of the department where the scam allegations are made will be investigated; Many are surprised by the decision of the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.