येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकातील कोंडी फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:27 IST2025-09-14T17:26:54+5:302025-09-14T17:27:53+5:30
- चौकात उड्डाणपुलासह ग्रेड सेपरेटर उभारण्यास ‘स्थायी’ची मंजुरी

येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकातील कोंडी फुटणार
पुणे : येरवडा येथील बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपुलासह ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) उभारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या चौकात होणारी कोंडी सुटणार आहे.
शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूडसह शहराच्या पश्चिम व दक्षिण भागातून विमानतळासह आळंदी व नगरकडे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात पाटील इस्टेट येथून संगमवाडी रस्त्यावरून येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकाचा वापर केला जातो. त्यामुळे दररोज सायंकाळी व सकाळी खडकीहून येरवड्याकडे जाताना संगमवाडी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, विमानतळ, बंडगार्डन पुलाच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
वाहनचालकांसह प्रवाशांना बराचसा वेळ चौकातील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. संगमवाडी येथील खासगी ट्रॅव्हल बसथांबा येथील ट्रॅव्हल याच चौकातून जात असल्याने कोंडीमध्ये आणखी भर पडते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बिंदू माधव ठाकरे चौकात उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार प्रकल्प विभागाने प्रकल्प आराखडा तयार करून यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
असा असेल उड्डाणपूल व समतल विलगक
- खडकीहून बंडगार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मार्गिका असणार आहेत.
- संगमवाडीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे व बंडगार्डनकडे जाण्यासाठी ‘वाय’ आकाराचा ग्रेड सेपरेटर केला जाणार आहे. हा ग्रेड सेपरेटर एकेरी असणार आहे.
- उड्डाणपुलाची लांबी ९०० मीटर, तर रुंदी १५.६० मीटर
- उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २-२ मार्गिका असणार आहेत
- संगमवाडीहून डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरची लांबी ५५० मीटर
- बंडगार्डनकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरची लांबी ४४० मीटर
- संगमवाडी बाजूचा ग्रेड सेपरेटर ९ मीटर रुंद व तीन मार्गिकांचा असेल
- डॉ. आंबेडकर चौक व बंडगार्डनकडे जाणारा ग्रेड सेपरेटर भाग ७.५ मीटर रुंद व प्रत्येकी दोन मार्गिकांचा असेल
- वळणाच्या ठिकाणी ग्रेड सेपरेटरची रुंदी १.५ मीटर अधिक असेल
- प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार
‘येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर करण्यात येणार आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे.’ - दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका.