पुणे - नगर महामार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती ग्रामपंचायतीने केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:48 IST2025-10-07T17:47:39+5:302025-10-07T17:48:33+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे.

पुणे - नगर महामार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती ग्रामपंचायतीने केली
रांजणगाव गणपती :पुणे - नगर महामार्गाजवळील कोंढापुरी हद्दीत असलेल्या कासारी फाट्याजवळ पावसामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वाहनचालक आणि ग्रामस्थ करत होते. मात्र, ‘लोकमत’च्या बातमीने प्रशासनाला झटका बसला असावा, कारण कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्वत:ची जबाबदारी घेऊन मुरूम टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी जोर धरत आहे.
कासारी फाटा हा पुणे अहिल्यानगर महामार्गावरून कासारी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी आणि न्हावऱ्याकडे जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. येथे नेहमीच दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पावसामुळे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये रंगत होती. याबाबत लोकमतने नुकतीच छायाचित्रांसह बातमी प्रसिद्ध केली होती, ज्यात खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती.
या बातमीची दखल घेऊन कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई केली. चांगल्या दर्जाचा मुरूम टाकून जेसीबीच्या मदतीने खड्डे बुजविण्यात आले. यामुळे वाहनचालकांची होणारी गैरसोय किमान तात्पुरत्या काळासाठी तरी दूर झाली आहे. ‘प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले; पण हे तात्पुरते आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे,’ असे कोंढापुरीचे सरपंच संदीप डोमाळे यांनी सांगितले.