राज्याची तिजोरी लुटून सत्तेवर आलेले सरकार; शशिकांत शिंदेंनी सरकारवर केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 21:23 IST2025-07-25T21:22:28+5:302025-07-25T21:23:03+5:30
सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे.

राज्याची तिजोरी लुटून सत्तेवर आलेले सरकार; शशिकांत शिंदेंनी सरकारवर केले आरोप
पुणे: सत्तेच्या अडीच वर्षात राज्याची तिजोरी लुटून हे सरकार सत्तेवर आले आहे. सरकार स्थापन होताच ८ महिन्यात ५७ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या करतात, फक्त ८ महिन्यातच मंत्री आणि मंत्र्यांची खाती बदलावी लागतात हे राज्य सरकारचे अपयशच आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. पक्षाचे राज्य सरचिटणीस रोहित पवार यांनी यावेळी आमची लढाई तुम्ही लढलात आता तुमची लढाई आम्ही लढू असे कार्यकर्त्यांना सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदी व सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने शिंदे व पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवड झाल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले म्हणून पक्षाच्या कार्यालयात त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना राज्य सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय करायचे याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. यांचे मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात असताना विधानसभागृहात रम्मी खेळत बसतात. बील थकले म्हणून तरूण कंत्राटदार आत्महत्या करतो. तरीही सरकारला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. टोलवाटोलवी करतात. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही.
रोहित पवार म्हणाले, आमची खासदारकी, आमदारकीची लढाई तुम्ही प्राणपणाला लावून लढलात, आता तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांची उमेदवारी आम्ही तशीच लढू. सर्व प्रकारची ताकद देऊ. सामाजिक कामांसाठी लढताना कोणीही त्रास देत असेल तर तिथे फक्त २४ तासांमध्ये पक्षाचा किमान एक नेता उपस्थित राहिल अशी रचना करणार आहोत. प्रामाणिक, तरूण कार्यकर्त्यांना नक्की उमेदवारी दिली जाईल. मतदान यंत्र मॅनेज करण्याचे नवे राजकारण यांनी सुरू केले आहे. त्यामुळे ही लढाई बूथवर आपण बारिक लक्ष ठेवण्यापासूनची आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्तविक केले. राज्य प्रवक्ते अंकूश काकडे यांनी स्वागत केले. आमदार बापू पठारे, माजी आमदार जयदेव काकडे यांचीही भाषणे झाली. पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने शिंदे व पवार यांचा सत्कार करण्यात आला.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची महापालिका निवडणुकीसाठी सर्व सज्जता आहे. चांगली कामगिरी होणार याचा विश्वासच नव्हे तर खात्री आहे, मात्र महाविकास आघाडी कि स्वतंत्र की आणखी काही याचा निर्णय प्रदेशकडून लवकर व्हावा. उशिरा निर्णय झाला की त्याचा परिमाण मतदारांवर व मग विजयावरही होतो. त्यामुळे पक्षाने याबाबतीत आघाडीतील अन्य पक्षांबरोबर लगेचच चर्चा सुरू करावी. त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शहराध्यक्ष जगताप यांनी केली.