हडपसर : पोलिसांना टोल फ्री नंबरवरून खून झाल्याची माहिती देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याची घटना उंड्री हांडेवाडी रस्त्यावर घडली. काळेपडळ पोलिसांनी संशयिताला अवघ्या दोन तासांतच जेरबंद केले. ही घटना शनिवारी (दि. २) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. रविकुमार शिवशंकर यादव (३३ वर्षे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी किसन राजमंगल सहा (२० वर्षे, रा. अजगारवा, पोस्ट पकडीदल, जिल्हा मोतीहारी, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास किसन राजमंगल सहा याने ११२ क्रमांकावरून पुणे पोलिस कंट्रोल रूमला संपर्क केला आणि आपला मित्र रविकुमार याने स्वतःच्या दुकानातून बेडशिट व गादी दिली नाही, म्हणून चार अनोळखी इसमांनी त्याच्या डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केले व निघून गेले आहेत, असा निरोप दिला होता. त्यानुसार महमंदवाडी बीट मार्शल व रात्रगस्त अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये पाहणी केली. त्याठिकाणी रविकुमार याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
दरम्यान, फोन केलेल्या तरुणाकडे घडलेल्या घटनेविषयी अधिक चौकशी केली असता, त्याच्या सांगण्यामध्ये विसंगती दिसली. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर तेथे मोटारसायकलवरून चार तरुण आल्याचे दिसले नाही. त्यामुळे फोन करून माहिती देणाऱ्या तरुणाकडे संशयाची सुई फिरली. त्या परिसरातील लोकांकडे चौकशी केल्यावर कळाले की, किसन सहा आणि रविशंकर यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण होत होते. पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर किसन सहा याने खुनाची कबुली दिली आहे. किसन सहा व मित्र रविकुमार यादव रात्री दारू पीत असताना रविकुमार याने शिवीगाळ करून, मारहाण केली. त्याचा राग मनात धरून किसन सहा याने दारू पिऊन झोपलेल्या रविकुमारच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करून खून केल्याचे सांगितले. त्यानुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, रत्नदीप गायकवाड, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलिस हवालदार प्रवीण काळभोर, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रवीण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे या विशेष पथकाने या गुन्ह्याच्या तपासात विशेष कामगिरी केली.