पुणे : वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार स्वीकारताना सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढविण्याचा केलेला दावा पूर्णपणे अशास्त्रीय आहे. याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाने आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना कांचन गडकरी यांनी केलेला ‘शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले, तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सुक्त व मंत्रोच्चार ऐकविले. त्यामुळे उत्पादन वाढले’. हा दावा पूर्णपणे अशास्त्रीय असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. मंत्रोच्चारांमध्ये काही विशेष सामर्थ्य असते आणि ते ऐकून सोयाबीनचे झाड स्वत:चे उत्त्पन्न वाढवू शकते ही गोष्ट शास्त्राच्या प्राथमिक तपासणीवरदेखील टिकणारी नाही. सध्या वारी चालू असून, ज्ञानेश्वर महाराज यांनी बाराव्या शतकात ‘मंत्रेची वैरी मरे, तर का बांधावी कट्यारे? म्हणजेच मंत्राने शत्रू मरत असेल तर कट्यार काय कामाची ? असा रोकडा कार्यकारण भाव सांगणारा प्रश्न विचारला आहे. असे असताना एकविसाव्या शतकात मंत्राने सोयाबीनचे उत्पन्न वाढविण्याचे दावे करणे हे उलट्या पावलाचा प्रवास आहे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सोयाबीनचे शेतकरी गेली अनेक वर्षे शासनाच्या धोरणामुळे अडचणींत येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनला शासनाने सांगितलेला हमीभाव न देता अशा स्वरूपाचे दैववादी उपचार सांगणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर ते केले जात असताना त्यांनी जर त्याचे खंडण केले नाही, तर शेतकऱ्यांना ते खरे वाटू शकतात म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र अंनिसमार्फत नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, रामभाऊ डोंगरे, प्रकाश घादगिने, सम्राट हटकर, मुक्ता दाभोलकर, अशोक कदम, मुंजाजी कांबळे, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख यांनी केली आहे.