मुलांनीच बनावट बक्षीसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले;अखेर तीन वर्षांनी मिळाला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:18 IST2025-09-10T10:18:33+5:302025-09-10T10:18:51+5:30
- ज्येष्ठ व्यक्तीला अखेर तीन वर्षांनी मिळाला न्याय

मुलांनीच बनावट बक्षीसपत्र केले अन् वडिलांना फसवून घराबाहेर काढले;अखेर तीन वर्षांनी मिळाला न्याय
पुणे : आजवर प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारी मुले पाहिली आहेत, पण बनावट बक्षीसपत्र करून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःच्या मुलांनीच घराबाहेर काढल्याचा वेदनादायी प्रकार घडला आहे. अन्नछत्रात खाण्याची वेळ आलेल्या ज्येष्ठाच्या कायदेशीर लढ्याला अखेर तीन वर्षांनी यश मिळाले आहे. न्यायालयाने मुलांनी फसवून केलेले बनावट बक्षीसपत्र रद्द केले आणि ज्येष्ठाला मालमत्तेवरील हक्क पुन्हा मिळाला.
सुरुवातीला मुलांनी आम्ही तुमची व्यवस्थित देखभाल करू व काळजी घेऊ असा शब्द देत वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट बक्षीसपत्र तयार केले आणि सगळी कागदपत्रे झाल्यानंतर मुलांनी वडिलांना घराबाहेर बाहेर काढले. वडिलांना अन्नछत्रात राहण्याची वेळ आली.
या घटनेनंतर ॲड. प्रकाश एकनाथ सिंदेकर आणि ॲड. प्रणाली रामदास बारगळ यांनी पुढाकार घेत पुण्यातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि तीन वर्षांच्या चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकाच्या बाजूने निर्णय दिला. मुलांनी फसवून केलेलं खोटं बक्षीसपत्र न्यायालयाने रद्द केले.
‘हा केवळ एक दावा नव्हता, तर ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायासाठीचा लढा होता. अशा प्रकारे मुलांनी फसवून आई-वडिलांची आयुष्याची कमाई उधळण करून त्यांना रस्त्यावर आणणे ही अतिशय खेदाची बाब आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. - ॲड. प्रकाश सिंदेकर आणि ॲड. प्रणाली बारगळ