साहित्य संमेलनाची शंभरी तीन विषयांमध्ये होणार ग्रंथबद्ध; शंभर वर्षांचा इतिहास उलगडणार
By राजू इनामदार | Updated: November 16, 2025 12:21 IST2025-11-16T12:21:13+5:302025-11-16T12:21:28+5:30
देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार

साहित्य संमेलनाची शंभरी तीन विषयांमध्ये होणार ग्रंथबद्ध; शंभर वर्षांचा इतिहास उलगडणार
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तब्बल १०० वर्षांचा इतिहास तीन विषयांमध्ये शब्दबद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात झाली आहे. साहित्य महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखक तसेच विषयांची निश्चिती करून प्रकाशनासाठी सन २०२७ मध्ये होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही वेळही ठरवली आहे.
देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार आहे. पुढील वर्षी (सन २०२६) ९९वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यात या ग्रंथांची घोषणा केली जाईल. त्यानंतर पुढील वर्षभर त्यावर काम सुरू राहील. त्यानंतर सन २०२७ मध्ये होणाऱ्या १००व्या संमेलनात या तीनही ग्रंथांचे प्रकाशन होईल.
महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. संमेलन झाल्यानंतर आलेल्या वृत्तांतामधून किंवा काही लेखांमधून व अहमदनगरच्या साहित्य संमेलनानंतर संयोजकांनी प्रकाशित केलेल्या 'संवाद' सारख्या पुस्तकातून क्वचितवेळी यावर लिहिले गेले आहे. 'संमेलनाध्यक्षांची भाषणे' यासारखी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, मात्र एकूण इतिहास असे कधीही लिहिला गेला नाही. त्यामुळेच हा प्रकल्प साकार करण्याची कल्पना पुढे आली, असे जोशी यांनी सांगितले.'राजकीय व सामाजिक भूमिका' असा एक विषय असेल 'लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या' या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेल्या संदेशापासून ते अलीकडच्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेल्या राजा तू चुकतो आहेस' या निर्देशापर्यंत, व्हाया आणीबाणीतील दुर्गा भागवत अशा प्रत्येक संमेलनाध्यक्षांचे धोरण, भूमिका,त्याचा परिणाम याचा धांडोळा या विषयामधून घेतला जाईल, महामंडळाने प्रा. प्रकाश पवार यांना याबाबत पत्र दिले असून, त्यांनी महामंडळाची विनंती मान्यही केली आहे. 'वाङ्मयीन भूमिका' हा दुसरा विषय आहे. यामध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या 'संजीवन समाधीची अनुभूती देते ते साहित्य' या व्याख्येपासून ते 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' या वादापर्यंत प्रत्येक वाङ्मयीन वादविवादाविषयी खोलवर माहिती घेऊन लिहिले जाईल. प्रा. रणधीर शिंदे यांनी यावर काम सुरू केले आहे.
मराठी भाषिकांच्या संस्कृतीत फरक पडला ?
'सांस्कृतिक भूमिका' हा तिसरा विषय असून, यातही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी संस्कृतीविषयी काय काम झाले? त्याचा मराठी साहित्यावर काय परिणाम झाला?, मुळात संमेलनामुळे मराठी भाषिकांच्या संस्कृतीत काय फरक पडला? वाचकांच्या भूमिकेत कायकाय बदल झाले? याचा सविस्तर आढावा घेतला जाईल. अविनाश सप्रे यांना महामंडळाने याविषयी जबाबदारी दिली.
यासाठीचे संदर्भसाहित्य, माहिती वगैरे सर्च आवश्यक गोष्टी महामंडळाकडून संबंधित लेखकांना दिल्या जातील. संमेलनाला उपस्थित व्यक्तींच्या मुलाखती, वगैरे गोष्टींचा तीनही खंडात समावेश असेल. सध्या प्राथमिक स्वरूपात हे काम सुरू आहे, त्याला अंतिम स्वरूप लवकरच मिळेल. तीनही ग्रंथ परिपूर्ण, सविस्तर, रंजक, माहितीपूर्ण व संदर्भग्रंथांचे मूल्य असलेले असे व्हावेत, अशी अपेक्षा आहे. - प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ