साखर कारखान्यांनी थकवली २ हजार कोटींची बिले, व्याजासह देण्याची राजू शेट्टी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:28 IST2025-12-11T13:26:39+5:302025-12-11T13:28:56+5:30
- एफआरपी न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला.

साखर कारखान्यांनी थकवली २ हजार कोटींची बिले, व्याजासह देण्याची राजू शेट्टी यांची मागणी
पुणे : राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन ४० दिवस उलटले असून, आतापर्यंत केवळ ३४ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. १ ते १५ नोव्हेंबर या काळातील ऊस गाळपाची २ हजार कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाई करावी व शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले तातडीने देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी माजी खासदार व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि साखर आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
एफआरपी न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील साखर हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला. या हंगामात राज्यातील १६३ साखर कारखान्यांनी १५ नोव्हेंबरअखेर जवळपास १ कोटी १० लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातील ३४ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, अद्यापही १२९ कारखान्यांनी २ हजार ५ कोटी रुपयांची एफआरपी दिलेली नाही.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कारखान्यांना एफआरपीची रक्कम देताना १५ टक्के व्याजासह द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांना एफआरपी न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.