मेट्रोचे लाड थांबवून भिडे पूल दिवसा खुला करावा; ४५ दिवसांतील काम १७५ दिवस झाले तरी अर्धवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:45 IST2025-10-26T13:45:26+5:302025-10-26T13:45:33+5:30
- ज्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर दिवाळीनिमित्त भिडे पूल सकाळी ६ ते रात्री ९ वाहतुकीसाठी खुला केला.

मेट्रोचे लाड थांबवून भिडे पूल दिवसा खुला करावा; ४५ दिवसांतील काम १७५ दिवस झाले तरी अर्धवट
पुणे : शहरातील रस्ते खड्डे आणि खोदल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नदीपात्रातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद आहे. पादचारी पुलासाठी मेट्रोला दिलेली मुदत संपल्याने आता मेट्रोचे लाड बंद करून भिडे पूल दिवसा वाहतुकीसाठी खुला करावा आणि पादचारी पुलाचे काम रात्रीच्या वेळी करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. बाबत मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त व पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांना निवेदन दिले आहे.
गणपती उत्सवामुळे १५ दिवस मेट्रोचे काम थांबवून पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला होता. त्यानंतर परत ९ सप्टेंबरपासून भिडे पूल एक महिन्याकरिता बंद केला. ज्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर दिवाळीनिमित्त भिडे पूल सकाळी ६ ते रात्री ९ वाहतुकीसाठी खुला केला.
रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम सुरू राहिले. दिवाळी संपताक्षणी पुन्हा एकदा भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. मुळात जे काम ४५ दिवसांत संपणे अपेक्षित होते ते १७५ दिवस झाले तरी अजून अर्धेही झालेले नाही. भिडे पूल मेट्रोच्या मालकीचा असल्यासारखे कधीही वाहतुकीसाठी बंद ठेवून नागरिकांची गैरसोय केली जात आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करू न शकलेल्या मेट्रोचे आणखी लाड न करता किमान दिवसा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि मेट्रोला उर्वरित काम रात्रीच्या वेळी पूर्ण करण्यास सांगावे, असे वेलणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.