राज्य आरोग्य प्रयोगशाळा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण हव्यात - आरोग्यमंत्री आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:04 IST2025-10-31T16:00:48+5:302025-10-31T16:04:59+5:30
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी औंध येथील ‘उरो’ रुग्णालयातील 102, 104 आणि 108 रुग्णवाहिका कॉल सेंटरला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

राज्य आरोग्य प्रयोगशाळा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण हव्यात - आरोग्यमंत्री आबिटकर
पुणे : राज्यातील एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. मंत्री आबिटकर यांनी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेला भेट देऊन अत्याधुनिक सुविधा, उपकरणे आणि चालू कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य उपसंचालक डॉ. एम. डी. धूम यांनी प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. येथील वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आबिटकर म्हणाले, राज्य आरोग्य प्रयोगशाळांनी रोगनिदान क्षेत्रात आदर्शवत काम करून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी द्यावी.
रुग्णवाहिका सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी औंध येथील ‘उरो’ रुग्णालयातील 102, 104 आणि 108 रुग्णवाहिका कॉल सेंटरला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना 108 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. 102 रुग्णवाहिका गरोदर मातांसाठी तर 104 कॉल सेंटर नागरिकांना आरोग्य मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटला आवाहन पुणे दौऱ्यादरम्यान आरोग्यमंत्री आबिटकर यांनी हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील महिलांमध्ये वाढत्या गर्भाशयमुख कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी त्यांनी चर्चा करून एचपीव्ही लस विकासाविषयी माहिती घेतली.