एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर सुरू करणार सीएनजी, पेट्रोल पंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:46 IST2025-11-05T12:45:20+5:302025-11-05T12:46:27+5:30

- २५० ठिकाणे केली निश्चित, उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय

Pune news ST Corporation to open CNG, petrol pumps at their premises | एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर सुरू करणार सीएनजी, पेट्रोल पंप

एसटी महामंडळ त्यांच्या जागेवर सुरू करणार सीएनजी, पेट्रोल पंप

पुणे : उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सीएनजी (किरकोळ विक्री) पंप सुरू करणार आहे. आर्थिक तूट कमी करण्यासाठी नवे पर्याय निर्माण करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीत केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे जिकिरीचे आहे. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीने स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून, याद्वारे केवळ एसटी बसेससाठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात, पेट्रोल पंप चालवणे आणि त्यांची देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेल व सीएनजी या पारंपरिक इंधनविक्रीबरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले पंप उभे करणे प्रस्तावित आहे. इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, अशा २५० पेक्षा जास्त जागेवर ४० बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही, तर रिटेल शॉपदेखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायांनाही पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक - खासगी भागीदारीतून चांगला महसूलदेखील मिळू शकतो. 

‘पेट्रो-मोटेल हब’ उभारणार

खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर देशातील नव्हे, तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एसटी महामंडळाच्या सुमारे २५० पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्त्वावर समुच्चय इंधन विक्री केंद्र उभे करण्यासाठी निमंत्रित करीत आहोत. जिथे एसटी महामंडळाला स्वतःच्या बसेससाठी इंधन भरण्याची सोय असेल; त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकालादेखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल. अशा पद्धतीचे ‘पेट्रो-मोटेल हब’ उभा करण्याचा मानस आहे. 

भविष्यात व्यावसायिक इंधनविक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल; तसेच महामंडळालाही उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल  - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री 

Web Title : एमएसआरटीसी अपनी भूमि पर सीएनजी, पेट्रोल पंप शुरू करेगी

Web Summary : राजस्व बढ़ाने के लिए, एमएसआरटीसी 250 से अधिक स्थानों पर सीएनजी और पेट्रोल पंप शुरू करेगी। इस पहल का उद्देश्य जनता के लिए एक विश्वसनीय ईंधन स्रोत और निगम के लिए आय का एक नया स्रोत बनाना है। सार्वजनिक-निजी भागीदारी के माध्यम से 'पेट्रो-मोटल हब' की योजना बनाई गई है।

Web Title : MSRTC to Start CNG, Petrol Pumps on Its Land

Web Summary : To boost revenue, MSRTC will launch CNG and petrol pumps at over 250 locations. This initiative aims to create a reliable fuel source for the public and a new income stream for the corporation. 'Petro-motel hubs' are planned through public-private partnerships.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.