इंजिनात बिघाड झाल्याने एस.टी. बस आगीत भस्मसात; इंदापूर एस.टी. बस आगारातील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:01 IST2025-10-26T20:00:57+5:302025-10-26T20:01:46+5:30
- प्रसंगावधान राखून त्यांनी एस.टी. बसमधील सर्व ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली.

इंजिनात बिघाड झाल्याने एस.टी. बस आगीत भस्मसात; इंदापूर एस.टी. बस आगारातील दुर्घटना
इंदापूर - इंदापूर एस.टी. बसस्थानकाच्या आवारात थांबलेल्या धाराशिव–पुणे एस.टी. बसच्या इंजिनात बिघाड होऊन ती जागीच भस्मसात झाली. शनिवारी (दि. २६) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एस.टी. बसचे चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखून एस.टी.तील सर्व ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रवाशांच्या ७ लाख ३९ हजार २०० रुपयांच्या वस्तू आणि एस.टी. बसचे १२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख ३९ हजार २०० रुपयांची वित्तहानी झाली आहे. एस.टी.चे वाहक कृष्णा गुलझार कांबळे (रा. घाटंग्री, ता. व जि. धाराशिव) यांनी इंदापूर पोलिसांकडे या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, पोलीसांनी सांगितले की, माहिती देणारे कांबळे आणि त्यांचे सहकारी एस.टी. चालक नेताजी रामलिंग शितोळे हे त्यांच्या ताब्यातील धाराशिव एस.टी. आगाराची धाराशिवहून पुण्याकडे जाणारी एस.टी. बस (क्र. एमएच २० बीएल ४२३३) घेऊन दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूर एस.टी. बसस्थानकाच्या आवारात आले. तेथील फलाट क्रमांक १२ वर बस थांबवून ते दोघे नोंदणी करण्यासाठी जात असताना, एस.टी.च्या इंजिनखाली ठिणग्या पडून आग लागल्याचे प्रवाशांनी पाहिले व आरडाओरडा केला. त्या आवाजाने ते दोघेही धावत बसजवळ आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळल्याने ती आटोक्यात आणता आली नाही. त्या परिस्थितीत प्रसंगावधान राखून त्यांनी एस.टी. बसमधील सर्व ५० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
या आगीत माहिती देणारे कांबळे यांचे वाहन चालवण्याचा परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड, नियमित वापरातील शासकीय गणवेश, तसेच प्रवासी निखील दत्तात्रय मेटे याचा वनप्लसचा टॅब, चार्जर, कपडे, पाकीट, आधारकार्ड, लायसन्स, पॅनकार्ड, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम कार्ड अशा एकूण ३५ हजार रुपयांच्या वस्तू जळाल्या.
तर प्रवासी पार्थ सचिन काळे याचे कपडे, बॅग, पॉवर बँक, चप्पल, चार्जर, वॉलेट व त्यातील १,००० रुपये; ओंकार बंडू मदने याचे कपडे, पाकीट, लायसन्स, पॅनकार्ड व ५,७०० रुपयांची रोकड; धनंजय विठ्ठल कांबळे यांच्याकडील गळ्यातील ४ तोळ्यांचा सोन्याचा गंठण, १ तोळ्याची सोन्याची अंगठी, कानातील दीड तोळ्याचे सोन्याचे दोन जोड, चांदीचे पैंजण, १२ साड्या, गाडीचे आर.सी. बुक, लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांच्या वस्तूंचा ऐवज जळाला.
अक्षय पांडुरंग तनपुरे यांच्याकडील ४.८ तोळ्यांचा सोन्याचा गंठण व पाच साड्या असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज; ऋषिकेश हरी खंडागळे यांचा लिनोआ व थिंक पॅड एचपी कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, सर्व कपडे, वॉलेट, पैसे, मोबाईल चार्जर, एचडीएफसी व एसबीआय बँकेची एटीएम कार्डे, कंपनीचे आयकार्ड व आधारकार्ड असा १ लाख रुपयांच्या वस्तूंचा तोटा झाला आहे.
नेहा गोविंदराव पाटील यांचे कपडे, मोबाईल चार्जर, वॉलेट व त्यातील कागदपत्रे बँक ऑफ बडोदा व युनियन बँकेची पासबुक्स, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व रोख १२,८०० रुपये असा एकूण १३ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. तसेच जगन्नाथ साहेबराव जाधव यांची बॅग व त्यातील साहित्य, प्रिंटर, चार्जर, डबा, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड व पत्नीची सर्व कागदपत्रे, तसेच ३,५०० रुपयांची रोकड असा ४,५०० रुपयांचा ऐवज आगीत जळाला असल्याची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.