सोमेश्वर कारखान्याच्या कामगार भरतीत अनुशेष भरलाच नाही;ऊस उत्पादकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:34 IST2025-09-10T13:33:21+5:302025-09-10T13:34:50+5:30

- करंजे येथील ऊस उत्पादकांचा आरोप, कारखानास्थळावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

pune news someshwar factorys backlog of worker recruitment has not been filled | सोमेश्वर कारखान्याच्या कामगार भरतीत अनुशेष भरलाच नाही;ऊस उत्पादकांचा आरोप

सोमेश्वर कारखान्याच्या कामगार भरतीत अनुशेष भरलाच नाही;ऊस उत्पादकांचा आरोप

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी करंजे (ता. बारामती) येथील ग्रामस्थ आणि ऊस उत्पादक सभासदांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

या उपोषणात करंजेचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे, संताजी गायकवाड, माउली केंजळे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, ॲड.बाळासाहेब गायकवाड, प्रताप गायकवाड, सुनील मोकाशी, नंदकुमार मोकाशी, अनिल हुंबरे, माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड, प्रकाश हुंबरे, प्रशांत जाधव, प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.

उपोषणकर्त्यांनी सोमेश्वर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप केला. यामुळे परिसरातील अनेक कुटुंब रोजगारापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. करंजे गावातील युवकांना कारखान्यात नोकरी न देण्याचा आणि काही घरांतील अनेक व्यक्तींना नोकरीवर ठेवण्याचा भेदभाव केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला. याशिवाय, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाकडून करंजे भागशाळेला सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.

२०१४ मध्ये ४७२ विद्यार्थ्यांचा पट असलेली ही शाळा २०२५ मध्ये २२० विद्यार्थ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा करत, समर्पित शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड यांनी केली.
 

संचालकांवर अवमानाचा आरोप

करंजेचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संचालक आनंदराव होळकर यांनी करंजे गावाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. याबाबत उपोषणकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला, तसेच कारखाना प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करत, सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांनी प्रशासनाविरोधात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली.

 
कारखाना प्रशासनाची भूमिका

सोमेश्वर कारखाना प्रशासनाने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करंजेपूल चौकीला पत्र देऊन, उपोषणकर्ते भाऊसाहेब हुंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्यांवर संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, उपोषणस्थळाकडे कारखाना संचालक मंडळ आणि प्रशासनाने पाठ फिरविल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.

उपोषणाला पाठिंबा

या उपोषणाला करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, मुरुमचे उपसरपंच सोमनाथ सोनवणे यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

Web Title: pune news someshwar factorys backlog of worker recruitment has not been filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.