जिल्ह्यातील सहा लाख ३४ हजार मतदार निवडणार तब्बल ३९८ नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:01 IST2025-11-05T10:01:25+5:302025-11-05T10:01:55+5:30
- १४ नगरपरिषदा, ४ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू ७३० मतदान केंद्र आणि ३२४० अधिकारी-कर्मचारी

जिल्ह्यातील सहा लाख ३४ हजार मतदार निवडणार तब्बल ३९८ नगरसेवक
पुणे: राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. यामुळे पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता मंगळवारपासून (दि. ४) लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी ६ लाख ३४ हजार मतदार ३९८ नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान करणार असून, थेट निवडीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, यावेळी नगर प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दूर्वास उपस्थित होते.
ते म्हणाले, 'या १४ नगरपरिषदांसाठी दोन आणि तीन सदस्य या पद्धतीने निवडणुका होणार आहेत, तर तीन नगरपंचायतींसाठी एक सदस्य प्रभाग या पद्धतीने निवडणुका होणार आहेत. बारामती, लोणावळा, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या पाच ठिकाणी प्रत्येकी एका प्रभागात तीन सदस्य पद्धतीने निवडणुका होतील, तर उर्वरित नऊ ठिकाणी दोन सदस्य प्रभाग या पद्धतीने निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील १४ नगरपरिषद मधील ३४७ प्रभाग संख्या असून, तीन नगरपंचायतींची प्रभाग संख्या ५१ एवढी आहे'.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ या अर्हता दिनांकावरील मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार १४ नगरपरिषदांसाठी ५ लाख ७९ हजार १९९ एवढे मतदार असणार आहेत, तर तीन नगरपंचायतींसाठी ५५ हजार ७४१ एवढी मतदारसंघ असणार आहे. जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांसाठी एकूण ६६०, तर नगरपंचायतीसाठी ७० असे एकूण ७३० मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० ते १००० मतदारांसाठी एक केंद्र असणार आहे. नगरपंचायतीसाठी मात्र १००० ते ११०० मतदारांमागे एक केंद्र असणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी मतदारयादी अंतिम झाली असली तरी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी ८११ कंट्रोल युनिट आणि १ हजार ६२२ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहेत, तर मतदान केंद्रनिहाय ८१० मतदान केंद्राध्यक्ष नेमण्यात आले आहेत. एकूण ३ हजार २४० मतदान अधिकारी कार्यरत असतील, असेही त्यांनी सांगितले.
या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे, तर लोणावळा, दौड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत. उर्वरित नगरपरिषदा या क वर्गात मोडतात, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर क वर्ग नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ११ तहसीलदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
एक वर्षांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे, तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार ही याचा संहिता केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी या क्षेत्रात सुमारे सहा लाख ३४ मतदार असून, त्यातील १७ हजार ७४४ मतदार दुबार आणि तिबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी