- प्रमोद गव्हाणे
वानवडी - फातिमानगर चौकामध्ये पादचाऱ्यांना होणारा प्रचंड त्रास, तसेच बस, अग्निशमन आणि रुग्णवाहिकांना पडणारा नाहक वळसा याबाबत वानवडी परिसरातील नागरिक असंतोष व्यक्त करीत आहेत. मात्र पोलिस प्रशासनाकडून पावले उचलली जाताना दिसत नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी फातिमानगर चौकात सोमवारी (दि.११) आंदोलन करण्यात आले. यात नागरिकांनी ये-जा करणाऱ्या वाहनांमधून जीव मुठीत घेत रस्ता ओलांडत निषेध नोंदविला. यात 'सेव्ह पुणे ट्राफिक मुव्हमेंट'चाही सहभाग होता.
काही महिन्यांपूर्वी वाहतूक विभागाकडून फातिमानगर चौकात 'सिग्नल फ्री चौक' उपक्रम राबविला. हा उपक्रम म्हणजे जीवाला घोर असल्याचा आक्रोश नागरिकांनी या आंदोलनात व्यक्त केला. यावेळी जवळपास शंभर नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत निषेध केला. या चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी करून एक फुटी दुभाजक टाकला. त्यावरून रस्ता ओलांडणे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांना अत्यंत धोकादायक बनले आहे.
भैरोबानाला चौकातून वळण घेत हडपसरला जावे लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागून कोंडी होत असते. तसेच पीएमपीएमएल बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांना दोन मिनिटांच्या अंतरासाठी १० ते १५ मिनिटे वेळ खर्च करुन वाहनांच्या कोंडीतूनच मार्ग काढावा लागत आहे.'सिग्नल फ्री चौक' उपक्रमामुळे होणारी गैरसोय पाहून याआधीही वाहतूक पोलिस, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणतेही ठोस उपाय याठिकाणी योजले गेले नसल्याचे येथील हर्षद अभ्यंकर, आशा शिंदे, नझीर खान, नर्गिस कात्रक या रहिवाशांनी सांगितले. पादचारी पूल आणि भुयारी मार्ग संपूर्ण शहरभर अपयशी ठरले आहेत.
नागरिकांच्या मागण्यासिग्नल पुन्हा सुरू करून उजवीकडे बंद केलेले वळण खुले करावे.सुस्पष्ट झेब्रा पट्टे आखावेत.सिमेंटच्या दुभाजकाऐवजी बोलाईस बसवणे.सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलिस चौकात असावेत.
चौक पूर्वी जसा होता तसा खुला करावाज्येष्ठ नागरिक आशा शिंदे म्हणाल्या, आपले शहर दुर्दैवाने पादचाऱ्यांपेक्षा वाहनांना महत्त्व देत असल्याने पादचाऱ्यांचे हक्क डावलले जात आहेत. सिग्नल फ्री चौक उपक्रम बंद करून चौक पूर्वी जसा होता तसा खुला करावा.
ज्येष्ठ, विद्यार्थ्यांनी करायचे काय ?स्थानिक रहिवासी नाझीर खान यांनी नमूद केले की, पूर्वी येथील जंक्शन सुरू असताना शाळकरी मुलेही रस्ता ओलांडू शकत होती. परंतु आता ती सुविधा त्यांच्याकडून हिरावून घेतली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला हा रस्ता जीव मुठीत घेऊनच ओलांडत आहे.
वरिष्ठांशी चर्चा करुन पादचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. - दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक, वानवडी वाहतूक पोलिस