श्रावणात देवदेवेश्वराचं मंदिर का असतं भाविकांचं केंद्र? कारण थक्क करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:26 IST2025-07-31T10:25:53+5:302025-07-31T10:26:10+5:30
दगडी बांधणीच्या पायऱ्यांवरून अंबारीसह हत्ती चढून जात असे यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. पेशव्यांचे देवस्थान असल्यामुळेच अगदी स्थापनेपासून हे मंदिर वैभवशाली आहे.

श्रावणात देवदेवेश्वराचं मंदिर का असतं भाविकांचं केंद्र? कारण थक्क करणार
पुणे : पर्वतीवरील देवदेवेश्वर महादेवाचे मंदिर म्हणजे पुणेकरांची अस्मिता आहे. नानासाहेब पेशव्यांनी सन १७४६ मध्ये या मंदिराची स्थापना केली. टेकडीवर असलेल्या या मंदिराच्या परिसराचा सुरेख विकास आता देवदेवेश्वर संस्थान करत आहे. त्यामुळे जुन्या पिढीतील भाविकांबरोबरच नव्या पिढीसाठीही पर्वती आता प्रिय झाली आहे.
दगडी बांधणीच्या पायऱ्यांवरून अंबारीसह हत्ती चढून जात असे यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. पेशव्यांचे देवस्थान असल्यामुळेच अगदी स्थापनेपासून हे मंदिर वैभवशाली आहे. मंदिरांचा एक मोठा समूहच तिथे आहे. तरीही महादेवाचे मंदिर हे मुख्य मंदिर. सदरेवरचा गणपतीही तेवढाच महत्त्वाचा. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात श्री गणेश म्हणून सुपारीचे पूजन करून केले जाते. नानासाहेबांना वाटले, सुपारी का? म्हणून, त्यांनी गणपतीची सुरेख मूर्तीच तयार करून घेतली. सदरेवरचा गणपती म्हणून ती आता प्रसिद्ध आहे. महादेव मंदिरात सुरेख पिंडी आहे. तिची नित्यनियमाने पूजा होत असते.
पर्वतीवर श्रावण मासात दर सोमवारी यात्राच असते. भल्या पहाटे नियमितपणे पायऱ्या चढून पर्वतीवर जाणारे अनेक पुणेकर आजही आहेत. पण श्रावणी सोमवारी दिवसभरच भाविक येत असतात. मुख्य महादेव मंदिरात सुरेख पिंड आहे. त्यावर भगवान शंकर, पार्वती व गणेश यांच्या मूर्ती आहेत. त्या सोन्याच्या होत्या असे सांगितले जाते. आता नाहीत. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. चिरे घडवून केलेले. त्यामुळेच ते आजही मजबूत आहे. पर्वतीवरची खरी मजा भव्य नगारखान्यात आहे. तिथे चौघडा वाजत असे. या मेघडंबरीला महिरपी असलेले दरवाजे आहेत. त्यातून पूर्वी थेट खडकीपर्यंतचे सगळे काही नीट दिसायचे. आता पुणे शहर दिसते.
दगडी पायऱ्या एका दमात चढून जायची स्पर्धा आजही होत असते. या पायऱ्यावर विसावे तयार केलेले आहेत. तिथे पूर्वी गंध लावणारे, फुलांची विक्री करणारे बसत असत. जुन्या पुणेकरांना या पायऱ्यावर बसलेली एक सगुणा आजही आठवत असेल. पर्वतीवर आता पेशवाईतील वस्तुंचे चांगले संग्रहालय आहे. पर्वतीला एक दु:खाची हळवी किनारही आहे. पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेबांना खूप मोठा धक्का बसला होता. शनिवारवाड्यातील वास्तव्य सोडून ते पर्वतीवरच येऊन राहिले होते. स्वत:च निर्मिलेल्या या मंदिर परिसरातच अखेर त्यांचा देह विसावला.