स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:43 IST2025-11-05T09:43:05+5:302025-11-05T09:43:50+5:30
बारामतीमधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात
बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी लढवेल, तर बारामती आणि माळेगावमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवली जाणार आहेत. मात्र भाजपच्या विरोधात आमची निवडणूक लढविणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत आमची युती होण्याची शक्यता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी स्पष्ट केले.
बारामतीमधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका आणि मते जाणून घेतली जात आहेत. नुकत्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी, दौंड आणि हवेली अशा आठ तालुक्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत पुणे जिल्ह्यात, विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात, महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार आहेत, असे ठरले. मात्र, नगरपालिकांच्या पातळीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्यात काही ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाविरुद्ध समविचारी स्थानिक पक्षांची आघाडी करून निवडणुका लढतल्या जाणार आहेत आणि या निवडणुकांसाठी पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरला जाणार नाही, अशी भूमिका आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी ज्यांच्याशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी योग्य वेळी निर्णय न दिल्याने आम्हाला फसवणूक झाली. त्यामुळे आता स्वतंत्रपणे बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे आघाडीमार्फत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा माळेगाव कारखाना निवडणुकीत पूर्वीप्रमाणे तयारी नव्हती, मात्र यावेळी सावधगिरीने निवडणुका लढविणार आहोत, असे कोलते म्हणाले.
अजित पवारांबरोबर युती नाही
बारामतीतील बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते युगेंद्र पवार उपस्थित होते. यामध्ये माळेगावला माळेगाव विकास आघाडी करणार आहे. इतरांबाबत माहिती नाही, मात्र, अजित पवार गटाबरोबर आमची युती होण्याची शक्यता नाही. मात्र, चुकुन त्यांच्या गटाचे काही लोक आल्यास ते आमच्या स्थानिक विकास आघाडीत सहभागी होवू शकतात. चिन्हाचा विचार करता घड्याळाबरोबर आमची युती नाही नसल्याचे विजय कोलते यांनी स्पष्ट केले.