ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे अनंतात विलीन; संशोधन, राजकीय क्षेत्रासह अन् मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:13 IST2025-09-18T20:12:57+5:302025-09-18T20:13:30+5:30

यावेळी संशोधन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.

pune news senior historical researcher Gajanan Mehendale passes away; Political, cultural and industry dignitaries including research personalities paid their last respects | ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे अनंतात विलीन; संशोधन, राजकीय क्षेत्रासह अन् मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे अनंतात विलीन; संशोधन, राजकीय क्षेत्रासह अन् मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत गुरूवारी (दि.१८) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संशोधन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.

तत्पूर्वी त्यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ठेवण्यात आले होते. येथे ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, मंदार लवाटे, श्रीधर फडके, राहुल सोलापूरकर, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, विक्रमसिंह मोहिते, भूपाल पटवर्धन, लीनाताई मेहेंदळे, केदार फाळके, श्रीनिवास कुलकर्णी, राजेंद्र जोग, सुधीर थोरात, अरविंद जामखेडकर, राजा दीक्षित, मोहन शेटे, यशोवर्धन वाळिंबे, जगन्नाथ लडकत, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, कर्नल पराग मोडक, विंग कमांडर शशिकांत ओक, संजय तांबट, मुकुंद संगोराम, दीपक पोटे, मिलिंद एकबोटे, सदानंद फडके आदींनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी वैकुंठ येथे अंत्यदर्शन घेतले.

मेहेंदळे यांनी पाच दशकांहून अधिक काळ इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. शिवचरित्र व युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी मराठी व इंग्रजीत शिवचरित्रावर ग्रंथ लिहिले असून त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झाले आहे. पारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य-असत्याचा शोध घेणे हा त्यांचा आवडता विषय होता.

१९७१ च्या युद्धात बांगलादेश व पाकिस्तान सीमेवर ते युद्ध पत्रकार म्हणून उपस्थित होते. तसेच मिलिटरी सायन्सचे ते द्विपदवीधर होते. ‘शिवाजी झाला नसता तर’, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि अन्य संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. सध्या ते दुसऱ्या महायुद्धावरील पाच हजार पानी ग्रंथावर काम करत होते.

गजानन मेहेंदळे यांच्या आकस्मिक निधनामुळे एक सत्यनिष्ठ व तपस्वी इतिहास संशोधक काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. भारतीय इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात परिश्रमपूर्वक प्रावीण्य मिळवून युद्ध पत्रकारितेत असलेल्या मेहंदळे यांनी श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाची साधने भारतभर धुंडाळली आणि अनेक भाषांचे प्राविण्य हस्तगत केले. ती तपस्या इतिहास संशोधन क्षेत्रात पदार्पण केलेल्या नवीन संशोधकांकरिता आदर्शवत आहे. - डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, रा. स्व. संघ

 

गजानन भास्कर मेहेंदळे हे जागतिक दर्जाचे इतिहासकार असून इतिहासातील साधनांचे मूल्यमापन कसे करायचे, याचा वस्तुपाठ त्यांनी इतिहास अभ्यासकांना घालून दिला. भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी अभ्यासकांची पिढी घडविली आहे तसेच त्यांना अभ्यासाची प्रेरणाही दिली. मंडळाचा भूतकाळ उज्ज्वल आहे मात्र मेहेंदळे यांनी वर्तमानकाळाला पुनरूज्जीवित केले. - प्रदीप रावत, अध्यक्ष, भारत इतिहास संशोधक मंडळ
 

गजानन मेहंदळे यांची ओळख म्हणजे साक्षेपी इतिहासकार अशी आहे. त्यांनी विविध भाषांत आणि संशोधनाविषय छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगासमोर मांडले पाहिजे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. इतिहासाचार्य राजवाडे आणि ग. ह. खरे हे त्यांचे आदर्श होते. शिवचरित्र सिद्ध करताना समकालीन राजकीय सत्ता त्यांचे इतिहास त्यांचे अधिकृत दफ्तरे यासाठी विविध भाषांचा अभ्यास केला. त्यामुळे एकूणच इतिहास संशोधन आणि प्रेमींसाठी ही दुख:द बाब आहे. - पांडुरंग बलकवडे,ज्येष्ठ इतिहास संशोधक 
 

गजानन भास्कर मेहेंदळे यांचा शिवचरित्राचा विशेष अभ्यास होता तसेच मोडी लिपीसह फारसी, अरबी, इंग्रजी, फ्रेंच या भाषांचा त्यांचा अभ्यास होता. या भाषांतील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा इतिहासाविषयीची सर्व कागदपत्र त्यांनी संकलित करत त्यांनी अभ्यास केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात दर आठवड्याला ते येऊन संशोधन, अभ्यास करत असत. तरुण अभ्यासकांना त्यांचे मार्गदर्शन मिळत असे. - भूपाल पटवर्धन, कार्यकारी मंडळ अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

इतिहासातील संशोधन आणि शिक्षण घेणाऱ्यांना त्याचा प्रमाण कसा सिद्ध करावा याविषयी त्यांचे विद्यार्थांना शिकवले आहे. त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधन आणि एकूणच इतिहासातील तज्ज्ञांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. मेहंदळे यांनी फारसी, मोडी लिपीतील विद्यार्थ्यांना तयार केले असून विद्यार्थ्यांनी संशोधन पुढे नेले पाहिजे.  - सुधीर थोरात, कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ 

 

Web Title: pune news senior historical researcher Gajanan Mehendale passes away; Political, cultural and industry dignitaries including research personalities paid their last respects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.