'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:58 IST2025-11-07T13:56:58+5:302025-11-07T13:58:08+5:30
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक सदस्य आणि दुसरे संचालक प्रा. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे आकस्मिक निधन झाले.

'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन
पुणे: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक सदस्य आणि दुसरे संचालक प्रा. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. एका परिषदेसाठी ते बीजिंगला गेले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली आणि उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्याेत मालवली. गेली अनेक वर्षे त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. बायपास शस्त्रक्रियाही झाली होती. बहुदा हृदयविकाराचा धक्का असावा. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे.
प्रा. दधिच यांचा जन्म १ सप्टेंबर १९४४ राेजी झाला. १९७१ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठात (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यासाठी त्यांना ज्येष्ठ शास्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांचे वडील प्रा. व्ही. व्ही. नारळीकर यांचे मार्गदर्शन लाभले हाेते. पीएच.डी संशाेधन पूर्ण करुन ते गणित विभागात प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
पुढे जुलै २००३ मध्ये डाॅ. जयंत नारळीकर यांच्या निवृत्तीनंतर ‘आयुका’चे दुसरे संचालक झाले. या पदावर त्यांनी ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत कार्यरत राहिले. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील क्वाझुलु-नताल विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले तसेच २०१२ ते २०१६ पर्यंत दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथील सेंटर फॉर सैद्धांतिक भौतिकशास्त्र येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात एमए अन्सारी अध्यासनाचे काम पाहिले.
पोर्ट्समाउथ, यूके आणि बिलबाओ, स्पेन येथील गुरुत्वाकर्षण संशोधन गटांसोबतही त्यांनी काम केल आहे. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी १०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. अनेक पीएच.डी विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षण केले आहे.