आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:30 IST2025-12-17T12:28:54+5:302025-12-17T12:30:27+5:30
- सात दिवसात कोणताही एक प्रशिक्षण कोर्स निवडा, असे आर्टीचे महासंचालक वारे यांचे आवाहन

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड यादी जाहीर
पुणे: मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठीची यादी आर्टीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, अराजपत्रित गट ‘ब,’ गट ‘क’, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा बॅँक, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, कर्मचारी निवड आयोग, पोलिस व सैन्यभरती अशा विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी आर्टीकडून सीईटी सामाईक चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.
त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेले प्राप्त गुण, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निवड यादी जाहीर केली असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.
निवड झालेल्या उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासावे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार सात दिवसात कोणताही एक प्रशिक्षण कोर्स निवडावा. आर्टीमार्फत कोणत्याही एका प्रशिक्षणासाठी त्यांची निवड केली जाईल, असे आवाहन सुनील वारे यांनी केले आहे.