सुरक्षा रक्षकाचे काम मुंबईत, पगार काढला पुणे महापालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:29 IST2025-04-17T16:29:26+5:302025-04-17T16:29:52+5:30
महापालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; ‘ईगल सिक्युरिटी’च्या ठेकेदाराला पालिकेने ठोठावला ६० लाखांचा दंड

सुरक्षा रक्षकाचे काम मुंबईत, पगार काढला पुणे महापालिकेत
पुणे : पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी निविदा काढली जाते. पण, या निविदेमध्ये अधिकच नफा मिळविण्यासाठी ठेकेदार कंपनीने नामी शक्कल लढविली आहे. या कंपनीकडे कामाला असणारे मुंबईमधील कर्मचारी पुणे महापालिकेत कामाला असल्याचे दाखविले आहे. या प्रकारे पुणे महापालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे या वर्षीसुद्धा याच ठेकेदाराला सुमारे ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिकेच्या विविध आस्थापनांवर कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमण्यात येतात. त्यामध्ये दवाखाने, उद्याने, महापालिका क्षेत्रिय कार्यालये, क्रीडांगणे, स्मशानभूमी, माध्यमिक विद्यालये, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, वस्तिगृह यांचा समावेश आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले जातात. सुरक्षा विभागाची निविदा ही किमान वेतन दराप्रमाणे काढली जाते. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, ईएसआय भरणे आवश्यक असते, तशा अटी-शर्ती निविदेमध्ये टाकण्यात येतात. त्यामुळे ठेकेदार नफा कमविण्यासाठी काम करीत नसलेल्या कामगारांची यादी जोडून महापालिकेची फसवणूक करतात. या कंपनीने मुंबईमध्ये काम करीत असलेल्या कामगारांची यादी जोडून महापालिकेची सहा महिने फसवणूक केली. ही बाब सुरक्षा विभागाच्या लक्षात आल्यानंतर कंपनीकडून सर्व रक्कम वसूल करण्यात आली आहे.
याच कंपनीला कामगारांची माहिती वेळेत न देणे, कामगारांच्या पगारामध्ये कपात करणे, ओळख परेडसाठी कामगार न पाठविणे, गणवेश न देणे यासाठी दोन वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. ईगल सिक्युरिटी ॲण्ड पर्सनल सर्व्हिसेस असे कंपनीचे नाव आहे. दोन वेळा या कंपनीची चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे या कंपनीला ६० लाख रुपयांचा एकूण दंड ठोठावण्यात आला आहे.