‘सवाई’त प्रथमच निनादले ‘सॅक्सोफोन’चे डायनॅमिक सूर;सॅक्सोफोन अन् सतारीच्या सुरांमधून रंगतदार सहवादनाची श्रवणीय अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:19 IST2025-12-12T10:18:02+5:302025-12-12T10:19:31+5:30
- सॅक्सोफोन अन् सतारीच्या सुरांमधून रंगतदार सहवादनाची श्रवणीय अनुभूती

‘सवाई’त प्रथमच निनादले ‘सॅक्सोफोन’चे डायनॅमिक सूर;सॅक्सोफोन अन् सतारीच्या सुरांमधून रंगतदार सहवादनाची श्रवणीय अनुभूती
पुणे : ‘सॅक्सोफोन’ या पाश्चात्य वाद्याचे जाॅत ब्रुक्स यांनी छेडलेले सूर आणि पं. कृष्णमोहन भट यांनी सतारच्या छेडलेल्या मंजूळ तारा... यातून विलक्षण रंगतदार सहवादनाची श्रवणीय अनूभूती रसिकांना मिळाली. आवाजाची तीव्रता बदलण्याची अफाट क्षमता असलेल्या 'सॅक्सोफोन'चे सूर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथमच निनादले अन् ‘वाह’ अशी दाद मिळाली. भारतीय अन् पाश्चात्य वाद्याच्या जुगलबंदीने महोत्सवाचा दुसरा दिवस रंगतदार ठरला.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक ह्रषीकेश बडवे यांच्या दमदार गायनाने झाली. सवाईच्या स्वरमंचावरील त्यांचे प्रथम सादरीकरण रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी राग गावतीमध्ये विलंबित झुमरा तालात ‘खबर सब की...’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘शान ए ताजमहल...’ ही बंदिश खुलवली. त्यानंतर श्रीकल्याण रागात रूपक तालातील ‘साहिब तुम करम करो...’ आणि मध्यलय त्रितालातील ‘सावरिया अब तो हम तुम संग...’ या दोन बंदिशी प्रस्तुत केल्या. रसिकांच्या आग्रहाखातर हृषीकेश यांनी ‘घेई छंद मकरंद...’ हे गाजलेले नाट्यपद अतिशय दमदारपणे सादर केले. उत्तम दमसास, तानांमधील फिरत आणि सादरीकरणातील आत्मविश्वास ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये ठरली.
यानंतर स्वरमंचावर आगमन झाले ते ज्येष्ठ सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे पुत्र आणि शिष्य युवा सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे. इंद्रायुध मुजुमदार यांनी धीरगंभीर अशा सरोदच्या तारा छेडल्या अन् वातावरणाचा नूरच पालटला. सरोदवर लीलया फिरणाऱ्या त्यांच्या जादुई बोटांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. इंद्रायुध यांनी राग श्री मध्ये आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करत, रागाचे जणू देखणे रूप साकारले. त्यांनी राग मांजखमाजमधील उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांच्या दोन रचना पेश केल्या. द्रुत लयीतील या वादनात तबलावादक ईशान घोष यांच्यासह सवाल जवाब विलक्षण रंगले. त्यांच्या वादनाला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महोत्सवाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांच्या सुमधुर गायकीने अभिजात मैफलीचा प्रत्यय रसिकांना दिला. विदुषी पद्माताईंनी राग शामकल्याण सादर केला. ‘जियो मेरो लाल...’ हा पारंपरिक ख्याल त्यांनी दमदारपणे पेश केला. त्रितालात निबद्ध 'रघुनंदन खेलत...' ही स्वरचित बंदिशही त्यांनी सादर केली.
गायन क्षेत्रातील दीर्घ अनुभव, घराणेदार तालीम, सादरीकरणातील परिपक्वता यांचे दर्शन त्यांच्या गायनातून घडले. सोहनीबहार रागातील 'नाथ देहो मोहें...' ही एकतालातील बंदिश त्यांनी ऐकवली. संगीत स्वयंवर या नाटकातील 'करीन यदुमनी सदना...' या नाट्यपदाने त्यांनी विराम घेतला. त्यानंतर सॅक्सोफोनवादक जाँर्ज ब्रुक्स आणि प्रसिद्ध सतारवादक पं. कृष्णमोहन भट यांचे स्वरमंचावर आगमन झाल्यानंतर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचे स्वागत केले. राग चारुकेशीच्या माध्यमातून या दोन्ही सिद्धहस्त कलाकारांनी आपापल्या वाद्यांवरील प्रभुत्व, वाद्यांच्या सौंदर्य निर्मितीच्या विविध शक्यतांचा स्वरपट रूपक तालाच्या साथीने उलगडत नेला. सतारीचे नाजुक झंकार सॅक्सोफोनच्या गंभीर नादाशी एकरूप होऊन गेले होते. त्यानंतर दोघांनी 'मांड'ची रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासह केलेल्या सांगीतिक प्रकल्पातील अहिरी रागावर आधारित रचनेने या विलक्षण रंगतदार सहवादनाची सांगता झाली.
मुग्धा कोंडे हिने लाईव्ह रेखाटले चित्र
विधि महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेणारी मुग्धा कोंडे ही पहिल्यांदाच सवाईला आली आहे. तिला स्केचिंगची आवड असल्याने तिने मैफल चालू असतानाच युवा गायक हृषीकेश बडवे आणि सरोदवादक इंद्रायुध मुजुमदार यांचे लाईव्ह चित्र रेखाटले. हे चित्र दाखविण्यात आल्यानंतर रसिकांनी तिचे खूप कौतुक केले.
पंडितजींना श्रोत्याचं पत्र
भारतरत्न पं. भीमसेन जोशी आज हयात नसले तरी एका रसिकाने भीमसेनजींनाच पोस्टकार्डवर पत्र लिहिले. आनंद साठे असे त्यांचे नाव. त्यांचे पत्र स्वरमंडपात वाचून दाखविण्यात आले. ते पत्रात म्हणतात, प्रिय भीमसेनजी, या महोत्सवाचं हे ७१ वं वर्ष आणि माझं या मैफिलीत श्रोता म्हणून सहभागी व्हायचं ४३ वं वर्ष. दरवर्षी एवढा मोठा संगीताचा सोहळा सातत्याने आयोजित करणं काही सोपं काम नाही. मला आज हे तुम्हाला जरूर सांगायला आवडेल की तुमच्या नंतर तुमची पुढची पिढीसुद्धा तितक्याच आत्मीयतेने हे काम करतेय. आज इथे ठेवलेली ही पत्रपेटी तुमच्यापर्यंत पोहोचायचं साधन वाटली. आणि न राहवून लिहिता झालो. काळाबरोबर पुढे आलेले, तरी आपली सांगीतिक परंपरा जपणारे महोत्सवाचे स्वरूप पाहायला तुम्ही असायला हवं होतं । - बाकी संगीत रूपानं तुम्ही इथे जाणवताच !
महोत्सवातील आजचे सादरीकरण - शुक्रवार (दि. १२ डिसेंबर, सायंकाळी ४ ते रात्री १०)
- सत्येंद्र सोलंकी - संतूर वादन
- श्रीनिवास जोशी - गायन
- उस्ताद शुजात हुसेन खान - सतारवादन
- डॉ. अश्विनी भिडे देशपांडे - गायन
२००० साली मी पंडित भीमसेन जोशी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी महोत्सवात आलो होतो. तेव्हा मी ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकात छोट्या सदाशिवची भूमिका करत असे. मी नमस्कार केल्यावर पंडितजींनी मला आशीर्वाद दिला. मला कौतुकाने मांडीवर बसवले आणि 'दिन गेले भजनाविण सारे...' या त्याच नाटकातील पदाच्या दोन ओळी गुणगुणल्या. मग चेष्टेने विचारले, काय, बरोबर आहे का? आज त्यांनीच सुरू केलेल्या या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटतो. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा माझ्यासाठी परमभाग्य आहे. - हृषीकेश बडवे, युवा गायक