Pune news: 'ससून'चा अजब कारभार...! मृताची माहितीच 'गायब'; काय आहे नेमका प्रकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:42 IST2026-04-10T12:41:45+5:302026-04-10T12:42:16+5:30

सर्वसामान्य नातेवाइकांना सरकारी कार्यालयांचे झिजवावे लागतात उंबरठे

Pune news Sassoon strange behavior The information about the deceased is 'missing' | Pune news: 'ससून'चा अजब कारभार...! मृताची माहितीच 'गायब'; काय आहे नेमका प्रकार ?

Pune news: 'ससून'चा अजब कारभार...! मृताची माहितीच 'गायब'; काय आहे नेमका प्रकार ?

लष्कर : पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ससून प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या मृत्यू दाखल्यांवर मृताचा पत्ता, वय, लिंग आणि आधार कार्ड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नोंदीच गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभारामुळे आधीच दुःखात असलेल्या नातेवाइकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी २०२६ रोजी ससून रुग्णालयात उपचार घेत असताना एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने नातेवाइकांकडून आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर जेव्हा नातेवाईक वॉर्ड क्रमांक १०० (मृत्यू दाखला विभाग) मध्ये दाखला घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना मिळालेल्या दाखल्यावर केवळ मृत महिलेचे नाव होते. पत्ता, वय, आई-वडिलांचे नाव आणि जोडीदाराचे नाव यांसारखे रकाने चक्क कोरे होते. 

पुणेकरांची मागणी
रुग्णालय अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी रोज शेकडो नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या 'आंधळ्या कारभारा'त तत्काळ सुधारणा करावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.

दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे 'डोक्याला ताप'
प्रशासनाच्या चुकीमुळे मिळालेला हा अपूर्ण दाखला दुरुस्त करणे म्हणजे नातेवाइकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. दुरुस्तीसाठी पुन्हा अर्ज करणे, संबंधित वॉर्डातील डॉक्टरांकडून माहिती प्रमाणित करणे आणि त्यानंतर अधीक्षक कार्यालयाची मंजुरी मिळवणे, अशी किचकट प्रक्रिया नातेवाइकांना सांगितली जात आहे. स्वतःच्या चुकांचा भुर्दंड ससून प्रशासन सामान्यांना का देत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शासनाच्या आणि पालिकेच्या फॉरमॅटनुसारच प्रमाणपत्र दिले जाते. जर माहिती भरूनही ती छापून येत नसेल, तर ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचण सोडविली जाईल.- डॉ. यल्लाप्पा जाधव, अधीक्षक, ससून रुग्णालय

'उद्या या' म्हणत बोळवण
जेव्हा नातेवाइकांनी या अपूर्ण माहितीबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा 'मॅडम सुट्टीवर आहेत, उद्या या,' अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. विशेष म्हणजे, या अर्धवट दाखल्यासाठी प्रशासनाने ५० रुपयांची पावतीही फाडली होती. कर्मचाऱ्यांच्या या असंवेदनशील वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ऑनलाइनचा फज्जा ?
मृत्यू नोंदीची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मृत्यू झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत सर्व माहिती पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असते. मात्र, ससूनमध्ये कर्मचारी माहिती भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासनाच्या ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक बिघाड आहे.

Web Title : ससून अस्पताल की लापरवाही: मृत्यु प्रमाण पत्र में महत्वपूर्ण जानकारी गायब, दुःख!

Web Summary : ससून अस्पताल प्रशासन की लापरवाही उजागर हुई है, मृत्यु प्रमाण पत्रों में पता और उम्र जैसी ज़रूरी जानकारी गायब है। अपूर्ण रिकॉर्ड के कारण शोक संतप्त परिवार नौकरशाही बाधाओं से जूझ रहे हैं। अस्पताल अधीक्षक ने देरी के तकनीकी मुद्दों को हल करने का वादा किया है।

Web Title : Sassoon Hospital's negligence: Death certificates lack crucial information, causing distress.

Web Summary : Sassoon Hospital's administration faces scrutiny after death certificates lacked essential details like address and age. Bereaved families struggle with bureaucratic hurdles due to incomplete records. The hospital superintendent has promised action to resolve the technical issues causing delays.