संजय जगतापांसमोर कमळ, की घड्याळ बांधण्याचा पेच;कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:17 IST2025-07-10T14:17:20+5:302025-07-10T14:17:42+5:30
- कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका

संजय जगतापांसमोर कमळ, की घड्याळ बांधण्याचा पेच;कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका
- बी.एम. काळे
जेजुरी : जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचेही नाव चर्चेत आले आहे. तेही भाजपवासी होणार, अशी चर्चा सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनीच थेट त्यांच्यावर पक्षबदलासाठी दबाव आणल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तालुक्यात दोन मतप्रवाह झाले आहेत. यामध्ये काही जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घड्याळाला पसंती दिली आहे, तर काही जण कमळ हातात घेण्याची गळ घालत आहेत. त्यामुळे संजय जगताप यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावबैठकांनी जोर धरला आहे.
गेल्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजप व इतर पक्षांचे सरकार स्थापन झाले. यानंतर यथावकाश संजय जगताप यांचे जवळचे सहकारी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपला जवळ केले. तेव्हापासून पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरू झाली होती. सत्तेशिवाय शहाणपण नाही, याच भावनेने.
पुरंदर हवेलीतील काँग्रेस कार्यकर्ते संजय जगताप यांना सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह करीत होते. कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी आपण योग्य तो निर्णय घ्या, नाही तर आम्हाला मोकळे करा, असा निर्वाणीचा इशाराही देऊ लागले होते. दरम्यानच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संजय जगताप यांना गळाला लावण्याचे मोठे प्रयत्न सुरू होते. जगताप पक्ष बदल करणार, अशी चर्चाही जाणूनबुजून सुरू केली जात होती. शेवटी याविषयीच्या चर्चा खऱ्या ठरण्याच्या मार्गावर आहेत. पक्षात सहभागी करून घेण्यासाठी भाजपच्या प्रदेशपातळीवरून गेल्या काही महिन्यांत मोठ्या हालचाली सुरू होत्या.
पुरंदर हवेली मतदारसंघ कायमस्वरूपी मिळवण्यासाठी संजय जगताप भाजपला हवेच आहेत. याशिवाय संजय जगताप यांचे शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केलेले आहे. सर्वच पक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत. युवा वर्गाची मोठी फळी त्यांच्या मागे असल्याने याच युवा फळीचा त्यांनी सत्तेबरोबर राहण्यासाठी मोठा आग्रह आहे.
यात पुरंदर हवेली मतदारसंघातील आरएसएसच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असल्याने मागील प्रत्येक निवडणुकीत त्यांनी संजय जगताप यांना साथ दिली होती. याच निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर आणि पक्षादेशामुळे संघ परिवार त्यांच्यापासून दूर होता. त्याचा मोठा फटका संजय जगताप यांना निवडणुकीत बसला. याशिवाय निवडणुकीत शरद पवारांचे खंदे समर्थक संभाजी झेंडे यांनी ऐनवेळी बंड करून अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली. यामुळेही त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. शरद पवारांमुळे जे मोठे झाले ते पवार साहेबांचे ऐकू शकत नाहीत का? अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची त्याचवेळी झाली होती. मात्र, कार्यकर्ते शांत होते; परंतु संग्राम थोपटेंच्या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्ते याबाबत उघड उघड बोलू लागले आहेत.
भविष्याच्या दृष्टीने कमळाला झुकते माप
पुरंदर तालुक्यामध्ये दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत; परंतु तालुक्याच्या हद्दीला लागूनच असलेल्या वीर, जेऊर या पट्ट्यामध्ये सोमेश्वर साखर कारखान्याचे जवळपास साडेतीन हजार सभासद आहेत. त्या जोरावर काही दुसऱ्या फळीतील नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे सुचवले. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार आणि संजय जगताप यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली आहे. संग्रथाप थोपटेंचेही तशीच परिस्थिती होती; पण त्यांनी भविष्याचा वेध घेत थेट हातात कमळ घेतले.
पुरंदरमध्येही आता त्या पद्धतीचेच वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना कार्यक्षेत्र सोडले, तर हवेली आणि पुरंदरमधील नेते म्हणतात, हातात कमळ घ्यावे. गत निवडणुकीत हवेली तालुक्यातील भाजपच्या ताकदीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता तर तालुक्यातील बहुतांश नेते भाजपच्या गोटात आहेत. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषकरून सासवड आणि जेजुरी नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजपशिवाय गत्यंतर नसल्याचे चित्र आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आ. संजय जगताप यांचे घरोब्याचे संबंध असल्यामुळेही संजय जगताप भाजपला जवळ करतील, अशीही चर्चा आहे.