सदानंदाचा येळकोट..! महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी; तीनही शिवलिंग दर्शनासाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:18 IST2026-02-15T12:16:33+5:302026-02-15T12:18:08+5:30
“येळकोट येळकोट जय मल्हार”, “सदानंदाचा येळकोट” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत दर्शन घेतले.

सदानंदाचा येळकोट..! महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी; तीनही शिवलिंग दर्शनासाठी खुले
- बी. एम. काळे
जेजुरी (पुणे जिल्हा): महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा मंदिर असलेल्या जेजुरी गड येथे मध्यरात्रीपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “सदानंदाचा येळकोट” आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत दर्शन घेतले.
महाशिवरात्रीच्या पुण्यकाळामुळे रविवारी पहाटेच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावरील कळसातील स्वर्गलोकीचे शिवलिंग, मुख्य गाभाऱ्यातील भुलोकीचे शिवलिंग आणि गाभाऱ्यातील उजव्या बाजूला असलेले पाताळलोकीचे शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले. वर्षातून एकदाच महाशिवरात्रीला या तीनही शिवलिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने भाविकांनी मोठ्या उत्साहात रांगा लावल्या.
महाशिवरात्री निमित्त जेजुरी गडावर मध्यरात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी, तीनही शिवलिंग दर्शनासाठी खुले#pune#Maharashtra#Mahashivratri2026pic.twitter.com/ltGFq9KAUb
— Lokmat (@lokmat) February 15, 2026
मुख्य मानकरी, उपाध्ये, पुजारी, नित्य वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा करून पहाटेच्या सुमारास तीनही शिवलिंगांचे दर्शन सुरू करण्यात आले. सलग दोन दिवस भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, मार्तंड देव संस्थान आणि जेजुरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र रांगा, सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची मदत ठेवण्यात आली. संपूर्ण गडकोटावर विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून काही भाविकांनी फराळाचे वाटपही केले. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी शांततेत आणि भक्तिभावात दर्शन घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.