प्रवाशांसाठी गुड न्यूज; सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या‘वंदे भारत’चे डबे वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:59 IST2025-08-01T13:59:40+5:302025-08-01T13:59:40+5:30
दि. २९ ऑगस्टपासून वंदे भारतचे चार डबे वाढविण्यात येतील, त्यामुळे सोळा डब्याची वंदे भारत भारत एक्स्प्रेस वीस डब्यांची होणार आहे.

प्रवाशांसाठी गुड न्यूज; सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या‘वंदे भारत’चे डबे वाढवणार
पुणे : सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे चार डबे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दि. २९ ऑगस्टपासून वंदे भारतचे चार डबे वाढविण्यात येतील, त्यामुळे सोळा डब्याची वंदे भारत भारत एक्स्प्रेस वीस डब्यांची होणार आहे.
सोलापूर-मुंबई आणि मुंबई-सोलापूरदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. २२२२६/२२२२५) या दोन्ही पुण्यातून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या आहेत. या गाड्यांना पुणे-मुंबई आणि मुंबई - पुणेदरम्यान सर्वाधिक गर्दी असतो.
शिवाय शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या गाडीला प्रवाशांची वेटिंग असते. त्यामुळे या गाडीला डबे वाढवावेत, अशी मागणीदेखील केली जात होती. रेल्वे प्रशासनाने मुंबई-नांदेड वंदे भारत आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्र रेक वापरण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारतमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ३१२ने वाढणार आहे.
साडेचार लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास :
सोलापूर - मुंबई आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअरकार आणि इकॉनॉमी क्लाससाठी १०० टक्केपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यात पुणे ते मुंबई आणि मुंबई - पुणेदरम्यान सर्वाधिक प्रतिसाद असून, जानेवारी २०२५ पासून या दोन्ही गाड्यांमधून एकूण ४ लाख ६९ हजार ६०९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
वाढत्या प्रवाशांमुळे या गाडीला चार डबे वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचा फायदा पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे