विदर्भ, मराठवाडा, खानदेशात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:29 IST2025-10-16T08:28:29+5:302025-10-16T08:29:49+5:30
- पुण्यात नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरील राज्यातील राहणाऱ्यांची संख्या जास्त

विदर्भ, मराठवाडा, खानदेशात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल
पुणे - दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण या सर्व भागात पुणे विभागातून ५८९ जादा बस सोडण्यात आल्या आहेत. यातील २५० बसचे आरक्षण फुल झाले आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यात नोकरी, शिक्षण आणि कामानिमित्त बाहेरील राज्यातील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळीत पुण्यातून गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. त्यामुळे एसटी, रेल्वेला त्यासाठी रेल्वेचे दोन महिने अगोदरच बुकिंग केले जाते. त्यामुळे रेल्वे बुकिंग दोन महिन्यांपूर्वीच फुल आहे. त्यानंतर रेल्वेने गर्दी कमी करण्यासाठी एकूण २८ विशेष गाड्यांद्वारे ९०० अधिक फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लखनौ, दिल्ली, दानापूर, गोरखपूर, नागपूर, लातूर, रत्नागिरी,
अजनीसह देशातील विविध भागांत जाणाऱ्या आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी व्हावी म्हणून काही गाड्या हडपसर आणि खडकी टर्मिनल येथून सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे गर्दीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विमानांना प्राधान्य
अनेक कंपन्यांना शनिवारपासून सुट्टया आहेत. त्यामुळे आयटी व इतर क्षेत्रातील प्रवाशांनी विमानाचा पर्यायदेखील निवडला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून, शनिवार, रविवार अशी विमान तिकिटांची मोठी मागणी आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी या तीन दिवसांचे तिकीट दर दुप्पट केल्याचे दिसत आहे; पण प्रवासाचा कालावधीत कमी वेळ लागत असल्यामुळे विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत.
मराठवाड्यासह विदर्भ या भागांतून सर्वाधिक बुकिंग
पुण्यातून मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. एसटीकडून सोडण्यात आलेल्या जादा बसपैकी मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या बसचे सर्वाधिक बुकिंग फुल झाले. यामध्ये अमरावती, परभणी, वर्धा, नागपूर, नांदेड, बीड, जालना, लातूर, हिंगोली, जळगाव, अकोला या ठिकाणी जाणाऱ्या बसचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी इतर बसचे बुकिंग फुल होईल.
नागरिकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून ५८९ जादा सोडण्यात आले आहे. बस बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. गर्दी वाढली तर प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी बस वाढविण्यात येतील. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी बसचा वापर करावा. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग