९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:32 IST2025-09-14T15:32:02+5:302025-09-14T15:32:28+5:30
गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करीत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली याचे समाधान आणि खूप आनंद आहे - 'पानिपत'कार विश्वास पाटील

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड
पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळून्खे, देविदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाड्मय परिषद, बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर हे घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत.
प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.
शनिवारी मार्गदर्शन समितीने संयोजकांसमवेत ठरविलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यास साहित्य महामंडळाच्या या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. हे संमेलन ४ दिवस होणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडीअम येथे होणार आहे.
गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करीत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली याचे समाधान आणि खूप आनंद आहे - 'पानिपत'कार विश्वास पाटील