गुळुंचे येथे रक्षाबंधनापूर्वी भावाच्या पार्थिवाला बांधली राखी;भावाचा आजारपणामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:44 IST2025-08-07T18:44:08+5:302025-08-07T18:44:37+5:30
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण. या सणादरम्यान बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आतुर असतात. हे नाते जगातील सर्वात पवित्र बंधन मानले जाते.

गुळुंचे येथे रक्षाबंधनापूर्वी भावाच्या पार्थिवाला बांधली राखी;भावाचा आजारपणामुळे मृत्यू
भरत निगडे
नीरा : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण. या सणादरम्यान बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आतुर असतात. हे नाते जगातील सर्वात पवित्र बंधन मानले जाते. मात्र, पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा एक हृदयद्रावक प्रसंग घडला. आपला भाऊ कायमचा सोडून गेल्याच्या दुःखात सख्ख्या तिघींसह चुलत पाच बहिणींनी भावाच्या पार्थिवाला राखी बांधली. यावेळी संपूर्ण कुटुंब आणि परिसर हळहळला.
मंगळवारी (दि.५) दुपारी गुळुंचे गावात ४५ वर्षीय सचिन हनुमंतराव निगडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सचिन हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि आई-वडिलांचा लाडका मुलगा होता. समाजात त्याच्या सौम्य आणि आदरयुक्त वागणुकीसाठी तो प्रसिद्ध होता. तीन बहिणींच्या लग्नानंतर सचिनचे लग्न झाले. एमएससीबीमध्ये नोकरी करत असताना एका घटनेने तो व्यथित झाला. यातून सावरत असतानाच त्याला दुर्धर आजाराने ग्रासले.
सचिनच्या कुटुंबीयांनी हार न मानता त्याच्या पत्नीला त्याच्या जागी नोकरीवर ठेवले. आजारपणात त्याची पत्नी, आई-वडील आणि बहिणींनी त्याची काळजी घेतली. सचिनवर त्याच्या तीनही सख्ख्या बहिणींचे प्रचंड प्रेम होते. त्यानेही कधीच कोणत्याही बहिणीला दुखावले नाही. रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या सणांना तो प्रत्येक बहिणीचा मान राखत असे. सख्ख्या तीन आणि चुलत पाच बहिणींची विचारपूस आणि काळजी तो नेहमी घेत असे. मात्र, मंगळवारी अचानक त्याचे निधन झाले आणि गुळुंचे गाव आणि परिसरातील लोक भावुक झाले.
रात्री अंत्यविधीवेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. सचिनच्या सौम्य स्वभावाचे सर्वजण कौतुक करत होते. त्याची आई आणि बहिणी आठवणींना उजाळा देत हंबरडा फोडत होत्या. काही पाहुण्यांच्या येण्याच्या प्रतीक्षेमुळे अंत्यविधीला विलंब झाला. मात्र, अंत्ययात्रा निघण्यापूर्वी एक हृदयस्पर्शी विचार पुढे आला. रक्षाबंधनाला अवघे चारच दिवस बाकी असताना सचिनच्या बहिणींना त्याला पुन्हा राखी बांधण्याची संधी मिळणार नव्हती. त्यामुळे आत्ताच राखी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
सचिन, ही शेवटची राखी!
सचिनच्या एका चुलत बहिणीने शेजारच्या दुकानातून आठ राख्या मागवल्या. अंत्ययात्रा निघण्यापूर्वी सख्ख्या तीन आणि चुलत पाच बहिणींनी एकाचवेळी सचिनच्या पार्थिवाच्या उजव्या हातावर राख्या बांधल्या. "सचिन, ही शेवटची राखी" असे म्हणत सर्वांनी हंबरडा फोडला. या प्रसंगाने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. गावातील प्रत्येक बहीण या दुःखात सहभागी झाली. सचिनच्या अकाली निधनाने गावकरी आणि कुटुंबीय शब्दात न मांडता येणाऱ्या दुःखात बुडाले आहेत.