महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:09 IST2025-08-06T21:09:15+5:302025-08-06T21:09:46+5:30
शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले.

महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप
पुणे : कोल्हापुरातील महादेवी हत्तिणीबाबत जे काही सुरू आहे, त्यात राजू शेट्टी दुटप्पीपणे वागत असल्याची टीका निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी केली. त्यांनी २०१८ मध्ये पाठवलेल्या एका पत्रामुळेच हा वाद उद्भवला असल्याचा आरोप आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. हत्तिणीबाबत कोल्हापूरकरांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे, असे ते म्हणाले.
आंधळकर यांनी पुण्यात बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. त्यांनीच सन २०१८ मध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्तिणीला सांभाळण्याची कसलीही व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरच पेटासारख्या संघटनांचे या विषयाकडे लक्ष गेले. २०१८ मधील पेटा संघटनेच्या प्रतिनिधींबरोबरचे शेट्टी यांचे छायाचित्रही आता सार्वजनिक झाले आहे. आता शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे आंधळकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय बंद असतानाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांच्या अंगात हत्तिणीचे छायाचित्र असलेला बनियन होता, बाकी कोणाच्या अंगावर मात्र असला बनियन नव्हता. यावरून ते हे सगळे काही राजकारणातील स्वत:ची विस्मरणात गेलेली प्रतिमा पुन्हा आणण्यासाठी करत असल्याची टीका आंधळकर यांनी केली. कोल्हापूरकरांच्या भावनाच इतक्या तीव्र आहेत की महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरला येणारच आहे, मात्र त्याच्याशी शेट्टी यांचा काहीच संबंध नसेल, असे आंधळकर म्हणाले.