'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:12 IST2025-11-06T14:12:00+5:302025-11-06T14:12:31+5:30
राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा ...

'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
पुणे : मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मतचोरीविरोधातील मोर्चात सहभाग घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले. या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले तसेच शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना राज ठाकरेंनी खास करून सुनावल्याची चर्चा रंगली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष असलेले परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले. राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या या फटकार्यानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली. कार्यकर्त्यांमध्ये मात्र यावरून मोठी चर्चा रंगली असून, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षातील शिस्त आणि निष्ठेबाबत कडक संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तसेच आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मतचोरी विरोधातील लढाईत महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. मतचोरीच्या विरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चात राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शाखा अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे.