पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार
By अजित घस्ते | Updated: March 25, 2025 16:06 IST2025-03-25T16:05:02+5:302025-03-25T16:06:33+5:30
झाडे किती, इमारती, विहिरी किती आणि कोठे आहेत याची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’ सर्व्हे करण्यात येणार

पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदरविमानतळाच्या संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राचे ड्रोनस सर्व्हेद्वारे जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पावले उचलली आहेत. त्यामध्ये नेमकी बागायत, जिरायत जमिनी किती आहेत, त्याचे प्रमाण किती, झाडे किती, इमारती, विहिरी किती आणि कोठे आहेत याची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’ सर्व्हे करण्यात येणार आहे.
मोजणीपूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात येणार असल्याने संपादित करण्यात येणारी जमीन कशा स्वरूपाची आहे त्याचा अंदाज येणार आहे. बागायत, जिरायत, विहीर, तसेच पड जमिनीच्या माहितीमुळे दरनिश्चिती करताना त्याचा फायदा होणार आहे. तसेच त्यावेळी कोणी जमीन मालकाने जमीन बागायत अथवा जिरायत असल्याचा दावा केला तर तो दावा या ड्रोन सर्व्हेच्या अहवालानुसार पडताळणे शक्य होणार आहे असे सूत्रांनी सांगितले.
पुरंदरविमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून २७५३.०५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २६७३.९८२ हेक्टर क्षेत्र हे खासगी क्षेत्र आहे. तसेच ७९.०७१ हेक्टर क्षेत्र हे सरकारी जमीन आहे. खासगी क्षेत्र २६७३.९८२ हेक्टर क्षेत्रापैकी ४२८.२१ हेक्टर हे जिरायत क्षेत्र आहे. तसेच २२३५.३५२ हे बागायत क्षेत्र आहे. तसेच १०.४२ हेक्टर क्षेत्र हे बिनशेती आहे. त्यामुळे या जमिनींचा ड्रोन सर्व्हे करून प्रत्यक्षात त्याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर एमआयडीसी आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त मोजणीवेळी ड्रोन सर्व्हेच्या अहवालातील बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
पुरंदर विमानतळासाठीच्या सात गावांतील जमिनीचे संपादन करण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अद्याप काढण्यात आले नाही. ते आदेश आल्यानंतर जमिनीची संयुक्त मोजणीसाठी शुल्क भरण्यास एमआयडीसीकडून कार्यवाही केली जाईल. तत्पूर्वी ड्रोन सर्व्हे करून तेथील जमिनीची माहिती घेतली जाणार आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी