नारायणगाव :पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प पूर्ण होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे ठाम मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. जगभरात १९ ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे प्रकल्प एकत्र असताना, जीएमआरटी स्वतःहून यावर तोडगा का काढत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रातील धना-मेथीच्या नवीन उपबाजाराचे उद्घाटन आणि पुणे-नाशिक महामार्गालगतच्या मंजूर सर्व्हिस रोडचे भूमिपूजन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अतुल बेनके होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे, कृषिरत्न अनिल मेहेर, सरपंच विनायक भुजबळ, अनंतराव चौगुले, विनायक तांबे, गुलाबराव नेहरकर, दिलीप कोल्हे, अंबादास हांडे, सचिन थोरवे, संचालक प्रकाश ताजने, पांडुरंग घाडगे, नबाजी घाडगे, तुषार थोरात, गजानन घोडे, आरती वारुळे, विमल तळपे, जनार्दन मरभळ, धनेश संचेती, सारंग घोलप, जितेंद्र कासार, सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे यांच्यासह शेतकरी आणि मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रीकूलिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग युनिट आणि अन्य सेवांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांद्याचे दर वाढवण्यासाठी संसदेत आंदोलन केले, तर केंद्रातील सत्ताधारी खासदार कांद्याचे दर कमी करण्यासाठी आंदोलन करतात, असा टोला त्यांनी लगावला. बाजार समितीसाठी आवश्यक योजना उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तांबे यांनी केले. प्रकाश ताजने यांनी आभार मानले.
राजकीय हेतूने मोर्चा : बेनके
माजी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नरच्या काही लोकप्रतिनिधींवर टीका करताना सांगितले की, बाजार समितीवरील मोर्चा राजकीय हेतूने काढला गेला, त्यात शेतकरी नव्हते. आळे येथील टॉवर लाइन प्रकरणात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे हित न पाहता ठेकेदारांचे हित पाहिले आणि त्याबदल्यात ३ कोटी रुपये घेतले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘सकाळी गरम आणि रात्री नरम’ असे सध्याच्या लोकप्रतिनिधींचे धोरण आहे. फक्त विरोधाला विरोध करायचा आणि स्वतःचे राजकारण साधायचे, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
जुन्नर बाजार समिती राज्यातील १५ उत्कृष्ट समित्यांमध्ये : अॅड. संजय काळे
बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी सांगितले की, जुन्नर बाजार समिती ही राज्यातील १५ उत्कृष्ट बाजार समित्यांपैकी एक आहे. धना-मेथीची १२७ कोटी, टोमॅटोची १६१ कोटी आणि तरकारीची १२८ कोटींची उलाढाल या समितीमार्फत होते. या बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येथे चांगला दर मिळतो आणि २४ तासांत पैसे मिळतात. त्यामुळे बीड, पुणे, नाशिक, नगर, सातारा येथील शेतकरी आपला माल घेऊन येतात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज सुरू करणार असून, जोपर्यंत कोल्ड स्टोरेज पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.