नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला पूर्वगणन समितीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:31 IST2025-09-13T12:30:36+5:302025-09-13T12:31:44+5:30

- एकतानगरी परिसरातील नदीलगतच्या नागरिकांच्या पूरमुक्तीसाठी पालिकेने उचललेले पाऊल

pune news pre-counting committee approves proposal of Rs 369 crore for river revitalization project | नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला पूर्वगणन समितीची मंजुरी

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला पूर्वगणन समितीची मंजुरी

पुणे : एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या भागातील इमारती व वस्तींचे पुरांपासून संरक्षण करण्यासाठी वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये देण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे २६ जून रोजी प्रस्ताव पाठवला होता. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी होत असतानाही त्यासाठीचा निधी व संबंधित पत्र महापालिकेस अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे, या भागातील नदीलगतच्या नागरिकांच्या पूरमुक्तीसाठी महापालिकेने नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून त्यास पूर्वगणना (एस्टिमेट) समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकतानगर भागातील अनेक सोसायट्या व दुकानांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे येथे असलेल्या सदनिकांना आणि दुकानांचा विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

तेच बरोबर, राज्याकडे आपत्ती निवारण निधी असतो. १५व्या वित्त आयोगानुसार एकतानगरी येथे आपत्ती निवारण निधी वापरता येऊ शकतो. त्यानुसार, पुणे महापालिकेने या भागासाठी ३०० कोटींच्या आपत्ती निवारण निधीची मागणी २६ जून २०२५ रोजी राज्य सरकारकडे पाठविली आहे. पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवर विषयांकित भागाचा समावेश असलेला वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा सुमारे ४.१० किलोमीटर लांब स्ट्रेच-६ आहे. नदी सुधार प्रकल्पाचा एक उद्दिष्ट म्हणजे पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी पाथवे व जॉगिंग ट्रॅक करणे, वृक्षारोपण, घाट विकसित करणे, नदीला मिळणाऱ्या नाल्यांचा विकास करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या भागातील इमारती व वस्त्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागातील मुठा नदीलगतच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये देण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली होती. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही निधी अजूनही मिळाला नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने हा काम स्वतः पुढाकार घेतला असून, या कामासाठी पूर्वगणनाला मंजुरी देण्यात आली आहे.

एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या भागातील इमारती व वस्त्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला पूर्वगणना समितीची मंजुरी मिळाली असून पालिका हा काम लवकरच सुरू करणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून निधी येण्याची अपेक्षा आहे.  - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Web Title: pune news pre-counting committee approves proposal of Rs 369 crore for river revitalization project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.