जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत राजकीय आतषबाजी; पवार विरुद्ध पवार लढतीसह भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:44 IST2025-10-15T19:44:00+5:302025-10-15T19:44:23+5:30
गावोगावी राजकीय गटबाजींना वेग आला असून, अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत राजकीय आतषबाजी; पवार विरुद्ध पवार लढतीसह भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
बारामती : येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत ऐन दिवाळीत राजकीय आतषबाजी रंगण्याची शक्यता आहे. थंडीच्या वातावरणात राजकारण तापण्याचे संकेत मिळत असून, बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण गट राखीव असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. २०१७ नंतर आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणारी ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. गावोगावी राजकीय गटबाजींना वेग आला असून, अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सोमवारी (ता. १३ ऑक्टोबर) कविवर्य मोरोपंत सभागृहात प्रांताधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. बारामती तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गण आहेत. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सहा गट आणि १२ गणांमध्ये विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत सुपे-मेडद गटात भाजपने जोरदार आव्हान उभे केले होते, परंतु राष्ट्रवादीने अखेरच्या टप्प्यात रणनीती आखत विजय खेचून आणला. सांगवी-डोर्लेवाडी आणि माळेगाव-पणदरे गटातही भाजपने चुरशीची लढत देत लक्ष वेधले होते.
यंदा बारामतीतील राजकीय समीकरणे बदलली असून, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य अजित पवार गटाकडे असून, तालुका आणि शहरातील अर्थकारणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या संस्थांवरही त्यांचे वर्चस्व आहे. दुसरीकडे, शरद पवार गट आणि महायुतीचा प्रमुख घटक असलेल्या भाजपसह इतर मित्रपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगावच्या निवडणुकीत भाजपने बिनविरोध प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला साथ देणार की स्वतंत्रपणे शड्डू ठोकणार, याबाबत उत्सुकता आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्याप निवडणूक रणनीती स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
आरक्षण सोडतीचा तपशील
सोडतीनुसार पंचायत समिती गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित झाले आहे:
सुपा, कऱ्हाटी, मुढाळे : सर्वसाधारण महिला
शिर्सुफळ, पणदरे, वडगाव निंबाळकर, निंबुत: सर्वसाधारण
गुनवडी: अनुसूचित जाती महिला
मोरगाव: नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
कांबळेश्वर, डोर्लेवाडी: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
निरावागज: अनुसूचित जाती
या आरक्षणामुळे काहींना नव्याने संधी मिळणार असून, काहींच्या आशा धूसर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बारामतीच्या या निवडणुकीत राजकीय पक्ष आणि गटांमधील चुरस तीव्र होण्याची शक्यता आहे.