पुण्यातही कबुतरांचा वाढता उपद्रव; वैकुंठ स्मशानभूमीत कावळ्यांपेक्षा कबुतरांची संख्या जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:38 IST2025-12-02T17:34:03+5:302025-12-02T17:38:36+5:30
- पुणे-मुंबईसह राज्यभर चिंता; आरोग्याला गंभीर धोका

पुण्यातही कबुतरांचा वाढता उपद्रव; वैकुंठ स्मशानभूमीत कावळ्यांपेक्षा कबुतरांची संख्या जास्त
पुणे : शहरांमध्ये कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एकीकडे मुंबईतील कबुतर खान्यांविरोधात वर्षानुवर्षे आंदोलने होत असली तरी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिक नागरिक वैतागले आहेत, तर दुसरीकडे आता हाच उपद्रव पुण्यातही डोके वर काढत आहे. वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी ठेवलेल्या नैवेद्यावर कावळ्यांपेक्षा कबुतरेच झपाट्याने तुटून पडत असल्याचे चित्र आहे. या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात वैकुंठ स्मशानभूमीतील नागरिकांनी सांगितले की, पूर्वी फक्त कावळेच नैवेद्य खात होते. पण आता कबुतरांनी कावळ्यांना हाकलून दिले आहे किंवा त्यांच्यात सामील होऊन प्रसाद खात आहेत. असे राहिले तर काही दिवसांत कावळेच पूर्णपणे गायब होतील आणि फक्त कबुतरच राहतील, अशी भीती आहे. कबुतरांची संख्या कावळ्यांपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. स्मशानभूमीतील प्रसादावर कबुतरांचा डल्ला मारणे हा केवळ प्रतीकात्मक नाही, तर आरोग्य व धार्मिक भावनांचा प्रश्न बनला आहे. हा उपद्रव आता पुणे-मुंबईपुरताच मर्यादित नसून, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा सर्वच मोठ्या शहरांत पोहोचला आहे.
पुण्याच्या उपनगरांमध्येही कबुतरांचा वावर
कोंढवा, हडपसर, कोथरूड, डेक्कन, स्वारगेट, वैकुंठ परिसरात कबुतरांचा मोठा वावर आहे. जुनी चौकट असलेल्या इमारती, बंद पडलेले सिनेमा थिएटर्स, जुन्या बाजारातील दुकानांच्या छताखाली कबुतरांचे मोठे थवेच राहतात. लोकांना खाण्यापिण्याची उरली-सुरली अन्नटाके, ब्रेडचे तुकडे टाकण्याची सवयही याला कारणीभूत आहे.
कबुतरांमुळे आजार पसरण्याचा धोका
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकॉकोसिस, साल्मोनेला, सिटाकोसिस असे जीवघेणे रोग पसरण्याचा धोका असतो. डासांप्रमाणेच कबुतरेही आता मानवी आरोग्यास ’घातक' बनली आहेत. त्यामुळे अस्थमा, श्वसनाचे आजार वाढण्याची भीती आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना काय करता येतील ?
मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय जुलै २०२५ मध्ये घेतला होता, पण प्रत्यक्षात फारसे काही झाले नाही. पुणे महापालिकेकडेही यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नाही. राज्यभरात एकसमान धोरण आखून कबुतरांना खाण्यासाठी अन्न टाकणे बंद करणे, जुन्या इमारतींमध्ये घरटे नष्ट करणे, जनजागृती मोहीम राबवणे, तसेच कबुतरांना गर्भनिरोधक औषध मिसळलेले धान्य देण्याचा पर्याय (जसे छ. संभाजीनगर, अहमदाबादमध्ये यशस्वी प्रयोग झाले) आदी उपाय योजावे लागतील.
लोकांकडून कबुतरांसाठी जे नदीपात्रात खाद्य टाकले जात होते, ते खाद्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जर कुणी खाद्य टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दशक्रिया विधीच्या ठिकाणी जी कबुतर येतात. त्यांची संख्या पूर्वी जास्त होती, आता ती संख्या कमी होत चालली आहे. - महेंद्र सावंत, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय