पुणे - रामटेकडी-सय्यदनगर परिसरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडलेल्या घटनेत पथारीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.
अतिक्रमण विभागाचे पथक सय्यदनगर डी.पी. रोडवरील नवीन म्हाडा रस्त्यावर कारवाईसाठी गेले असताना, फुटपाथवर अनधिकृतरित्या भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी पथकावर दगड व लोखंडी वजनाच्या मापाने हल्ला चढवला. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी अतिक्रमण विभागाचे सहायक निरीक्षक किरण शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सोहेल शेख, शाहीद मौलाली शेख व अन्य अज्ञात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेवेळी होणारे विरोध आणि वाढते हल्ले ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.