‘ओला’, ‘उबेर’च्या रिक्षा अन् कॅब चालकांकडून प्रवाशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:30 IST2025-12-05T15:29:33+5:302025-12-05T15:30:11+5:30
- बुक केल्यानंतर प्रवाशांवर लादले जाते किलोमीटरप्रमाणे भाडे

‘ओला’, ‘उबेर’च्या रिक्षा अन् कॅब चालकांकडून प्रवाशांची लूट
पुणे : रिक्षा अन् कॅबचालक मोबाइल ॲपवरून प्रवासी सेवा देताना ॲपवर प्रवासी भाडे कमी असेल, तेव्हा ‘किलोमीटर’ प्रमाणेच भाडे आकारले जात आहे. रिक्षा अन् कॅबचालकांच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामधून प्रवासी आणि रिक्षा, कॅबचालक यांच्यात रोजच वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. शिवाय यातून प्रवाशांची लूट होत आहे. यामुळे रिक्षा अन् कॅबचालकांवर कोणाचा अंकुश आहे की नाही? असा सवाल प्रवासी करत आहेत.
मुक्तपरवाना धोरणामुळे शहरातील रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे प्रवासी खेचण्याची तीव्र स्पर्धा सुरू झाली असून, अनेक रिक्षा आणि कॅबचालक ओला, उबेरच्या ॲपवरून प्रवासी सेवा देतात; परंतु प्रवाशांनी रिक्षा किंवा कॅब बुक केल्यानंतर रिक्षाचालकांकडून मोबाइल ॲपवर दर्शवलेले दर आकारण्याऐवजी जादा भाडे देण्याची मागणी केली जाते. प्रवासी अनेकदा रिक्षा बुक करताना ॲपवर दाखवलेल्या दरांनुसारच रिक्षा बुक करतात; परंतु रिक्षाचालक प्रवाशांजवळ आल्यानंतर अथवा फोन करून रिक्षाची सेवा ही मीटरनुसार असल्याचे सांगतो. त्यावेळी प्रवासी त्याला ॲपनुसार भाडे आकारण्याचा आग्रह धरतात; परंतु रिक्षाचालक ते नाकारतात. अशावेळी रिक्षाचालक तुम्हीच रिक्षा रद्द करा, असे सांगतात. यातून अनेकदा वादावादी होत आहेत. त्यामुळे अशा सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या दरामध्ये स्पष्टता आणण्यासाठी परिवहन विभागाने योग्य कार्यवाही करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आर्थिक भुर्दंडासह प्रवाशांना नाहक मनस्ताप
प्रवासी कुटुंबासोबत जाताना रिक्षा बुक करतात. अशावेळी नेमके रिक्षा आणि कॅब चालकांकडून अडवणूक करण्यात येते. शिवाय सोबत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असले तर प्रवाशांना दुसरा पर्यायच राहत नाही. त्यामुळे ॲपवर रिक्षा बुक करताना कमी दर असले तरी पर्याय नसल्याने मीटरप्रमाणेच जादा भाडे देण्याची वेळ प्रवाशांवर येते. त्यामुळे रिक्षाचालकांकडून होणारी अडवणूक मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नव्या उद्योजकांमुळे कॅबच्या संख्येत भर
शहरात जवळपास ७० हजार कॅबची वाहने असून, कॅबची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या सुमारे २० आहेत. ही वाढ मागील दीड ते दोन वर्षांत झाली. त्यामुळे ओला, उबेर या कंपन्यांची मक्तेदारी वाढली आहे. शिवाय नवीन उद्योजक कॅब व्यवसायात सामील झाल्याने कॅबची संख्या वाढली आहे. शहरात दररोज कॅबच्या माध्यमातून सुमारे ५ ते ६ लाख नागरिक यातून प्रवास करीत आहेत. शिवाय अनेक वेळा कमी दर असेल तर जास्तीचे भाडे आकारतात. त्याचा फटका प्रवाशांना बसतो.
अशी आकडेवारी
वाहन संख्या --- प्रवासी संख्या
- रिक्षा १ लाख २० हजार -- १८ ते २० लाख
- कॅब ९० हजार -- ६ ते ७ लाख
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले दरच राज्यात लागू असून, इतर कोणतेही दर कोणालाही प्रवाशांकडून आकारता येणार नाही. शिवाय ‘उबेर’, ‘रॅपिडो’ या कंपन्यांना दर ठरवण्याचे अधिकार नसून, आरटीओने जाहीर केलेले दर लागू आहेत. गर्दीचा फायदा घेऊन रिक्षाचालकांकडून चुकीच्या पद्धतीने दर आकारणे चुकीचे आहे. - बापू भावे, खजिनदार, रिक्षा फेडरेशन
‘ओला’, ‘उबेर’ यांना प्रवासी दर ठरविण्याचा अधिकार नाही. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी गर्दी नसताना कमी दर आकारले जातो. शनिवार, रविवार, सुट्टीच्या दिवशी दुप्पट दर आकारला जातो. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांची फसवणूक आहे. त्यामुळे रिक्षाचालक आरटीओने ठरवून दिलल्या प्रमाणेच दर रिक्षा चालविणे बंधनकारक आहे. - शफिक पटेल, अध्यक्ष, आझाद रिक्षाचालक संघटना