पक्षश्रेष्ठींना ना काळजी..ना खंत;जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय अवस्था बिकट,गळतीकडे दुर्लक्ष
By राजू इनामदार | Updated: July 16, 2025 13:52 IST2025-07-16T13:51:28+5:302025-07-16T13:52:15+5:30
राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील राजकीय अवस्था किमान भक्कम राहिली आहे. तरीही श्रेष्ठींना ना काळजी आहे, ना खंत, असा सूर काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी-कार्यकर्ते खासगीत आळवत आहेत.

पक्षश्रेष्ठींना ना काळजी..ना खंत;जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय अवस्था बिकट,गळतीकडे दुर्लक्ष
पुणे : दिग्गज नेते, पदाधिकारी पक्ष सोडताहेत. पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी शिल्लक राहिलेला नाही. कार्यकर्ते सुस्त झाले आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील राजकीय अवस्था किमान भक्कम राहिली आहे. तरीही श्रेष्ठींना ना काळजी आहे, ना खंत, असा सूर काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी-कार्यकर्ते खासगीत आळवत आहेत.
जेधे, गाडगीळ, मोरे ही स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील जिल्ह्यातील काँग्रेसची जुनी घराणी. त्यांनी पक्ष बांधला, वाढवला, जोपासला. मात्र आता माजी आमदार अनंत गाडगीळ वगळता पक्षासोबत कोणी राहिलेला नाही. अनंत गाडगीळही पक्षातून जवळपास बाहेरच आहेत. जे सातत्याने पक्षाच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून येत तेच सहकार महर्षी अनंतराव थोपटे, बाजीराव पाटील, चंदुकाका जगताप व अन्य घराण्यातील पुढची पिढीही पक्ष सोडून जात आहे.
विधानसभा निवडणुकीआधी पक्षाचे संग्राम थोपटे (भोर), संजय जगताप (पुरंदर) व रवींद्र धंगेकर (कसबा) हे ३ आमदार होते. तिघेही विधानसभेला पराभूत झाले. आधी धंगेकर, नंतर थोपटे, आता जगतापांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील तीन पंचवार्षिकमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे महापालिकेच्या विसर्जित सभागृहात पक्षाचे अवघे ९ नगरसेवक होते. जिल्हा परिषदेतील अवस्थाही बिकटच होती. पंचायत समिती, ग्रामपंचायत इथेही पक्षाला लक्षणीय यश मिळाले नाही. आज खासदार, आमदार व नगरसेवक या सर्व स्तरावर पक्षाची दयनीय अवस्था आहे. एकही लोकप्रतिनिधी नाही, असा हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असावा, अशी खंत पदाधिकारी व्यक्त करतात.
पूर्वी पक्षाच्या चिंतन बैठका चालायच्या, प्रदेश शाखेकडून अनेक कार्यक्रम यायचे, त्याचा आढावा घेतला जायचा. कार्यकर्ते, पदाधिकारी यांची वैचारिक बैठक पक्की व्हावी, यासाठी संघटनेच्या स्तरावर व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन केले जायचे. त्यातील काही शिबिरे तर निवासी असायची. त्यातून पक्षाला पूर्णवेळ कार्यकर्ते मिळायचे. त्यांच्यातून पदाधिकारी तयार व्हायचे. पदाधिकाऱ्यांमधूनच नंतर लोकप्रतिनिधींची निवड व्हायची, असे पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता इतकी पडझड होऊनही पक्षश्रेष्ठींना त्याचे फारसे सोयरसूतक पडलेले दिसत नाही, असे शिल्लक राहिलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
आता बैठकीचा उपयोग काय?
पुरंदरचे पक्षाचे माजी आमदार संजय जगताप यांच्या काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनमध्ये बुधवारी (दि. १६) दुपारी २ वाजता जिल्हा काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चिरे ढासळण्याआधीच ही काळजी घ्यायला हवी होती, असे मत या बैठकीसंबंधी बोलताना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
निष्ठावान घराण्यांकडे लक्ष द्यावे
सगळे निष्ठावान सोडून चाललेत त्याच्या कारणांचा पक्षाने शोध घ्यायला हवा. पुणे लोकसभेची उमेदवारी मागील ३ ते ४ वेळा पक्षाने चुकवली, त्याचा परिणाम विधानसभेवर झाला व विधानसभेचा परिणाम महापालिकेवर. किमान आता तरी पक्षाने निष्ठावंत घराण्यांची दखल घेऊन त्यांना पक्षात सन्मान देणे गरजेचे आहे. - अनंत गाडगीळ,माजी आमदार, काँग्रेस