फुले स्मारकाच्या एकत्रिकरणाच्या बाधित जागेसाठी ८५ टक्के जागा मालकांना रोख रकमेऐवजी हवे घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:04 IST2025-07-24T16:03:52+5:302025-07-24T16:04:55+5:30
वर्षानुवर्षे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देऊन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचे सर्वक्षण पुणे महापालिकेने केले आहे.

फुले स्मारकाच्या एकत्रिकरणाच्या बाधित जागेसाठी ८५ टक्के जागा मालकांना रोख रकमेऐवजी हवे घर
पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधील गंज पेठेत महात्मा जोतिराव फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे दीडशे मीटर अंतरावरच वेगवेगळी स्मारकं आहेत. ही दोन्ही स्मारकं एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागेवर आजमितीला जुनी घरे आणि वाडे असून, ३५८ जागा मालक, ६२४ भाडेकरू आणि सुमारे २५ झोपड्यांसह एकूण ९८२ बाधितांचा समावेश आहे. त्यात तब्बल ८५ टक्के जागा मालकांनी रोख रकमेऐवजी घराची मागणी केली आहे. विशेष म्हणजे एकाच जागेसाठी भाडेकरू, जागा मालक दोघांनाही घर हवे आहे.
गंज पेठेत महात्मा फुले वाडा आहे. या वाड्याशेजारी अवघ्या दीडशे मीटर अंतरावर महापालिकेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारले आहे. हा वाडा आणि स्मारकाला रोज नागरिक भेट देण्यासाठी येतात. मात्र येथे वाहतूक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने व नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता तातडीने विकसित करण्याची गरज असल्याची मागणी सातत्याने केली जात होती. या दोन्ही स्मारकांच्या मध्ये निवासी भाग आहे.
वर्षानुवर्षे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देऊन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचे सर्वक्षण पुणे महापालिकेने केले आहे. स्मारकाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र उपायुक्तांची नेमणूक झाली. त्यानुसार स्वतंत्र चार पथके तयार करून, बाधितांना मोबदला कसा हवा आहे, याचे सर्वेक्षण पूर्ण केले. सर्वेक्षणासाठी चार क्लस्टर तयार केले होते. प्रत्येक क्लस्टरसाठी १२ जणांचे पथक नेमले होते. काही घरे केवळ १०० चौ. फुटांची, तर काही २ हजार चौ. फुटांपर्यंतची आहेत.
८० टक्के बाधितांची घराची मागणी
सर्वेक्षणात जवळपास ८० टक्के भाडेकरू आणि ८० टक्के जागा मालकांनी घराच्या मोबदल्यात घराची मागणी केली आहे. काही व्यावसायिकांनी व्यावसायिक जागेच्या बदल्यात तशीच जागा मागितली आहे. काही जागा मालकांनी रोख रकमेची मागणी केली आहे. सध्याच्या नियमानुसार एकाच जागेसाठी दोघांना मोबदला देता येत नाही. एकाच जागेसाठी भाडेकरू, मालक दोघांनीही घराची मागणी केल्यामुळे नेमके काय करायचे, याबाबत प्रशासनाला मध्यममार्ग काढावा लागणार आहे.
छगन भुजबळ करणार पाहणी
देशातील पहिली मुलींची शाळा भरलेल्या बुधवार पेठेतील भिडे वाडा स्मारकाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज, गुरूवारी पाहणी करणार आहे. त्यानंतर गंजपेठेतील महात्मा जोतिराव फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही दोन्ही स्मारके एकत्रित करण्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यांची पाहणी गुरूवारी सकाळी १० वाजता छगन भुजबळ करणार आहे. त्यावेळी या दोन्ही स्मारकांच्या कामांचा ते आढावा घेणार आहे.