कांद्याच्या भावात वाढ; दोन दिवसांपासून किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:57 IST2025-12-13T18:57:11+5:302025-12-13T18:57:30+5:30
- परदेशासह देशातून मागणी वाढल्याचा परिणाम

कांद्याच्या भावात वाढ; दोन दिवसांपासून किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ
पुणे : बांगलादेशने वाढवलेली आयात, श्रीलंकेसह दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, संपत चाललेला जुन्या मालाचा साठा, आकाराने लहान असलेला नवीन माल... या सर्व परिस्थितीमुळे कांद्याच्या भावात सध्या दोन दिवसांपासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत कांद्याच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे ५ ते ७ रुपये वाढ झाली आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात मागील दोन दिवसांपूर्वी कांद्याला १० ते १५ रुपये भाव मिळत होता. त्याच कांद्यास आज शुक्रवारी (दि.१३) १५ ते २३ रुपये भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. बाजारात मुबलक माल उपलब्ध असल्याने एप्रिल महिन्यापासून कांद्याला कमी भाव मिळत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बांगलादेशात कमी प्रमाणात येथून माल जात होता. मात्र, त्यांनी आता आयात वाढवलेली आहे. श्रीलंका आणि दक्षिण भारतातून मागणी वाढली आहे. त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपण्याचा मार्गावर आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम नवीन कांद्यावर झाला आहे. उत्पादन घटण्याबरोबरच कांद्याचा आकार लहान आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
येथील बाजारात पारनेस, श्रीगोंद्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि जिल्ह्यातील आंबेगाव भागातून जुन्या कांद्याची आवक होत आहे. नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. जुन्या कांद्याची मागील आठवड्यात १२० ते १३० गाड्या आवक होत होती. त्यामध्ये घट झाली आहे. शुक्रवारी १०० ट्रक आवक झाली. गुरुवारी बाजाराला सुट्टी होती. त्यामुळे शुक्रवारी झालेली आवक दोन दिवसांची आहे. दररोज आता किती आवक होईल, हे येत्या दोन-तीन दिवसांत कळेल.
मागील ८ महिन्यांपासून कांद्याला कमी भाव मिळत आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्टीसह पर्यटनास गेलेल्या नागरिकांमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याला मागणी जास्त वाढली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केटयार्ड