पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. अशा वेळी कामानिमित्त बाहेर पडणारे प्रवासी ॲपवर रिक्षा बुक करत होते, पण त्यांना बराच वेळ वेटिंगवर राहावे लागले. तसेच ज्यांना रिक्षा मिळाल्या त्यांना जादा भाडे द्यावे लागले. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारामुळे पुणेकर प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
नेहमी रिक्षाचालक प्रवाशांच्या शोधत फिरत असतात. परंतु पावसाच्या वेळी वाहनांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने रिक्षाचालक त्याचा गैरफायदा घेतात. तसेच अशावेळी रिक्षा, कॅबचालकांकडून ॲप बंद करून ठेवण्यात येते. शिवाय ज्याचे ॲप सुरू असते, ते लवकर प्रवासी घेत नाहीत. त्यांना सारखे वेटिंगवर ठेवले जाते. त्यांनतर भाडे स्वीकारले जाते. परंतु भाडे दीड ते दोन पट अधिक आकारले जाते.
इतर वेळी रिक्षाचालकांकडून प्रवासी खेचण्याची तीव्र स्पर्धा सुरू असते. परंतु पाऊस असल्यावर रिक्षाचालकांकडून मोबाइल ॲपवर दर्शवलेले दर आकारण्याऐवजी जादा भाडे आकारण्याचे धोरण अवलंबिले जाते. तसेच प्रवासी अनेकदा रिक्षा बुक करताना ॲपवर दाखवलेल्या दरांनुसार रिक्षा बुक करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु अशा वेळी रिक्षाचालक त्यांच्याजवळ आल्यानंतर अथवा फोन करून रिक्षाची सेवा ही मीटरनुसार असल्याचे सांगतो. त्यावेळी प्रवासी त्याला ॲपनुसार भाडे आकारण्याचा आग्रह धरतात; परंतु रिक्षाचालक ते नाकारतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागतो.
अवाच्या सव्वा दर आकारणी :सकाळच्या टप्प्यात अनेकांना कामासाठी इच्छितस्थळी वेळेत जायचे असते. नेमके अशा वेळी कॅब आणि रिक्षाचालकांकडून गैरफायदा घेतला जातो. अनेक रिक्षाचालक मुद्दम ॲप बंद करून ठेवतात. शिवाय मीटरप्रमाणे चला असा तगादा लावतात. ॲप आणि मीटर यातील दरामध्ये तफावत आहे. जवळचे असेल तर मीटर परवडते. तसेच लांबचा प्रवास असेल तर ॲप परवडते. अशावेळी रिक्षा आणि कॅबचालकांकडून सोयीनुसार मीटर आणि ॲपचा वापर करण्यात करण्यात येते.
शहरातील रिक्षांची संख्या :एकूण रिक्षा : १ लाख २० हजार
शहरातील सरासरी रिक्षाचालक : १ लाख ५० हजार
‘ओला’, ‘उबेर’ वरील रिक्षाचालकांनी ॲप बंद ठेवणे, दीड पट भाडे आकारणे चुकीचे आहे. अशा रिक्षाचालकांची तक्रार नोंद करावी. रिक्षाचालक आरटीओने ठरवून दिलेल्या दराने रिक्षा चालविणे बंधनकारक आहे. - बापू भावे, खजिनदार, रिक्षा फेडरेशन पाऊस चालू असल्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी कर्वेनगर ते बाणेर जाण्यासाठी ओलाचा ऑटो बुक केला. तर त्यांनी पंधरा ते वीस मिनिट वेटिंगला ठेवून बुकिंग घेतले. त्यातही वाहतूककोंडी झाल्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी इतर वेळेपेक्षा खूप उशीर झाला. - अंबिका देशमुख, नोकरदार