पिंपरी : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानांतून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, बदललेल्या जीवनशैलीत आणि एलपीजीवर अवलंबून असलेल्या शहरी कुटुंबांसाठी हा निर्णय प्रत्यक्षात कितपत उपयोगी ठरणार, याबाबत शंका उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्याची उपयुक्तता मर्यादित ठरणार आहे. कारण शहरात स्टोव्ह कुठे आहेत, असा प्रश्न आहे.
इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचे वाटप करण्याचे नियोजन आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने २० मार्च रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केरोसीन परवान्यांचे त्वरित नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रलंबित परवाने आपोआप मंजूर मानले जाणार असून यासाठी कोणतेही अर्ज, नूतनीकरण, विलंब शुल्क न आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारसाच्या नावे परवाने तत्काळ वर्ग करण्यात येणार असून जेथे परवानाधारक नाहीत, तेथे रेशन दुकानदारांनाच परवाना देण्यात येणार आहेत.
एकेकाळी स्वयंपाकासाठी रॉकेल हा प्रमुख पर्याय होता; मात्र गेल्या दशकभरात शहरातील बहुतांश घरांमध्ये एलपीजी गॅसचा वापर वाढला आहे. केरोसीन स्टोव्ह जवळपास अप्रचलित झाले आहेत. नवीन पिढीकडे स्टोव्हच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रॉकेल मिळणार खरे, पण वापरायचे कसे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दुकानदारांना दिलासा
या निर्णयामुळे राज्यातील रेशन दुकानदारांना नवीन व्यवसायाची संधी मिळणार असून अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे. बंद पडलेली रॉकेल वितरण यंत्रणा पुन्हा सुरू होणार आहे.
नागरिकांसमोरील अडचणी
- केरोसीन स्टोव्हची अनुपलब्धता
- वापराची सवय कमी
- सुरक्षिततेचे प्रश्न
- अतिरिक्त खर्च (स्टोव्ह खरेदी/दुरुस्ती)
घरगुती गॅसची टंचाई आहे. त्यामुळे शहरातही रॉकेल मिळणे चांगले आहे; पण आमच्याकडे स्टोव्हच नाहीत, तर रॉकेल वापरायचे कसे हा प्रश्न आहे. - ज्योती कांबळे, गृहिणी, गांधीनगर
गॅस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेल मिळाल्यानंतर किमान अडचणीच्या काळात कुटुंबातील स्वयंपाक बनवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल - संगीता आढाव, घरकुल चिखली
ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉप किपर फेडरेशनच्या वतीने रेशन दुकानदारांना रॉकेल वितरणाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. रेशन दुकानदारांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. - विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉप किपर फेडरेशन
Web Summary : Maharashtra restarts kerosene distribution via ration shops due to fuel shortages. However, many urban residents lack stoves, questioning the practicality despite gas scarcity. Shopkeepers gain business.
Web Summary : ईंधन की कमी के कारण महाराष्ट्र में राशन दुकानों से केरोसिन का वितरण फिर शुरू। शहरी निवासियों के पास स्टोव नहीं, गैस की कमी के बावजूद उपयोगिता पर सवाल। दुकानदारों को फायदा।